धाराशिव – धाराशिव शहरातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील दुकाने निरीक्षक विवेक वासुदेव हेडाऊ यांना लाचखोरी प्रकरणी धाराशिवच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हेडाऊ यांनी 2012 मध्ये राज ऑफसेट व स्टेशनरी सप्लायर्स या दुकानाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी दुकानाच्या मालकाकडून 200 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, हेडाऊ यांनी पंचासमक्ष 200 रुपयांची लाच मागितली होती आणि ती रक्कम खाजगी लेखनिक दत्तात्रय आनंदराव दाने यांच्याकडे दिली होती. दाने यांनी ही रक्कम त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवली होती.
न्यायालयाने हेडाऊ यांना कलम 7 आणि 13(1)(ड), 13(2) अन्वये 3 वर्षांचा कारावास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्यांना 1 महिन्याचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. दाने यांना मात्र या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास श्रीमती अश्विनी भोसले, तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धाराशिव यांनी केला होता. सरकारी अभियोक्ता म्हणून पी. के. जाधव यांनी काम पाहिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.