धाराशिव: एकाच घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करणे आणि बेकायदेशीर अटक करणे तुळजापूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) टी. आर. भालेराव यांना चांगलेच भोवले आहे . याप्रकरणी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी सपोनि भालेराव यांच्यावर ‘कर्तव्यात अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व अशोभणीय वर्तन’ केल्याचा ठपका ठेवत २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अभिषेक राजेंद्र माने यांच्या कुटुंबाविरुद्ध श्रीमती भाग्यश्री किरण इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ११ जून २०२४ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात एनसीआर नं. ४९६/२०२४ (कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही, सपोनि भालेराव यांनी तीन दिवसांनी, १४ जून २०२४ रोजी, त्याच घटनेप्रकरणी श्री. माने यांच्या कुटुंबियांविरुद्ध गु.र.नं. २५५/२०२४ (कलम ३०८, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि) प्रमाणे दुसरा गुन्हा दाखल केला.
अशा प्रकारे एकाच घटनेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाच्या अर्णेश कुमार विरुद्ध बिहार राज्य’ (२०१४) या खटल्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असताना , सपोनि भालेराव यांनी अर्जदारास बेकायदेशीर अटक करून कायद्याचे उल्लंघन केले.
या प्रकरणाची दखल घेत तुळजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी खात्यांतर्गत चौकशी करून शिक्षा देण्याबाबत आदेशित केले होते. तसेच, अभिषेक माने यांनी देखील २० मे २०२५ रोजी याबाबत तक्रारी अर्ज दिला होता.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशीअंती, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम आदेश जारी केला. यात सपोनि टी. आर. भालेराव (सध्या नेमणूक पोलीस ठाणे येरमाळा) यांना कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे वर्तन केल्याबद्दल मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम, १९५६ मधील तरतुदीनुसार २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.






