धाराशिव: धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता रितू खोकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती खोकर यापूर्वी सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. संजय जाधव हे सध्या नव्या पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.
संजय जाधव यांची अवघ्या ९ महिन्यात बदली
संजय जाधव यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.
विशेषतः तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलीस दलासमोर होते. या प्रकरणी अद्यापही काही प्रमुख आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जाधव यांच्या बदलीमागे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील तपासातील कथित अपयश असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. तथापि, अधिकृतपणे बदलीचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.
नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासमोर आता धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे तसेच प्रलंबित मोठ्या गुन्ह्यांचा तपास मार्गी लावण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला कसा फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर ह्या भारतीय पोलीस सेवेतील २०१८ च्या तुकडीमधील पोलीस अधिकारी आहेत. त्या मूळच्या हरियाणा राज्यातील पानिपत येथील असून त्यांचे वडील गावचे सरपंच होते. श्रीमती खोकर यांनी कुरुक्षेत्र विद्यापीठामधून एम.एस्सी. (गणित) विषयात सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना सन्मानित केले होते. रितू खोकर या सध्या सांगली जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही काम पाहिलेले आहे.
धाराशिवला काही दिवसापूर्वी अपर पोलीस अधीक्षक म्हणून शफकत आमना यांची नियुक्ती झाली होती. आता पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती झाल्याने धाराशिव पोलीस दलात महिला राजचा दबदबा राहणार आहे.