धाराशिव: शासन नियमांचे पालन न करणे, वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करणे, महिला अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुद्ध असभ्य वर्तन करणे आदी अनियमितता आढळून आल्याने संजयकुमार डव्हळे, उपविभागीय अधिकारी, धाराशिव यांना निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. श्री. डव्हळे यांनी उपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत असताना शासन नियमांचे पालन केले नाही, वरिष्ठांचे आदेशाचे पालन केले नाही, वरिष्ठांचे आदेशानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी यांना धमकावले, महिला अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध असभ्य वर्तन केले, विविध संघटना मार्फत प्राप्त तक्रार अर्जांकडे दुर्लक्ष केले, श्री. डव्हळे यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस बजाविल्यानंतरही नोटीसांना उत्तर दिले नाही, अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या अनियमितता आढळून आल्या आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याने श्री. डव्हळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीअन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीपर्यंत श्री. डव्हळे यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे असेल. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या पूर्व संमत्तीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.
निलंबनाच्या कालावधीत श्री. डव्हळे यांना निलंबन निर्वाह भत्ता देण्यात येईल. मात्र, या काळात त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.या कारवाईमुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.