धाराशिव – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या सर्व्हिस रस्ता आणि नालीच्या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून, कामाची गुणवत्ता पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, संबंधित कंत्राटदाराला दर्जेदार काम करण्याचे सक्त आदेश द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात आलेल्या नालीवरील स्लॅब काही दिवसांतच कोसळले आहेत. अनेक ठिकाणी नालीवर धोकादायक भगदाड पडली असून, यामुळे वाहनधारक आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. स्लॅब टाकताना त्यावर पुरेसे पाणी मारण्यात न आल्याने ते अल्पावधीतच ढासळत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार म्हणजे कंत्राटदाराच्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा नमुना असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या सर्व्हिस रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती आहेत. मात्र, वसाहतींमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांवर नालीचे बांधकाम करताना अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यापासून नालीची उंची अवाजवी वाढवण्यात आली आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर, सर्व्हिस रस्त्यालगत उभारलेले विजेचे खांबही सरळ रेषेत नसून वाकडेतिकडे उभारण्यात आले आहेत. संपूर्ण सर्व्हिस रस्ता एकसमान नसून काही ठिकाणी त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे. हा रस्ता सर्वत्र किमान ६ मीटर रुंदीचाच असावा, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
एकंदरीत, सर्व्हिस रस्ता आणि नाल्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामाची देखभाल करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याला सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः कामाची पाहणी करावी, उर्वरित काम तात्काळ थांबवावे आणि हे काम दर्जेदार करण्याबाबत संबंधित अधिकारी व कंत्राटदाराला कडक शब्दांत आदेशित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या संपूर्ण कामाची गुणवत्ता गुणनियंत्रकाकडून (क्वॉलिटी कंट्रोल) त्रयस्थपणे तपासावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
जर या सर्व्हिस रस्त्याचे व त्यालगतच्या नालीचे काम दर्जेदार झाले नाही, तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा खणखणीत इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासह रवि वाघमारे, युवराज देशमुख, प्रदीप साळुंके, आणि इतर असंख्य संतप्त नागरिक व शिवसेना कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकारामुळे धाराशिवमधील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.