धाराशिव: पंधरा महिन्यांत आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ‘सुखमनी कंपनी’ने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती आता आणखी वाढली आहे. या प्रकरणात तब्बल १०० हून अधिक लोकांना गंडा घातल्याचे समोर आले असून, या घोटाळ्याचा एक प्रमुख सूत्रधार जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शाखाधिकारी असल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी लोकांचा विश्वास संपादन करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
या फसवणुकीतील मुख्य आरोपींपैकी एक असलेले महादेव कुदळे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काटी (ता. तुळजापूर) शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सून, शितल कुदळे, जी मूळची तासगावची आहे, तिने यापूर्वी याच कंपनीत काम केले होते. या ओळखीचा आणि महादेव कुदळे यांच्या बँक अधिकारी पदाचा फायदा घेऊन आरोपींनी लोकांचा विश्वास संपादन केला. सुरवातीला ३५ जणांकडून १ कोटी ६ लाख ५७ हजार रुपये उकळल्याचे समोर आले होते, मात्र आता फसवणूक झालेल्यांची संख्या १०० च्या वर गेली आहे.
फसवणुकीच्या पैशातून आलिशान बंगला
आरोपी महादेव कुदळे यांनी फसवणूक केलेल्या पैशांमधून धाराशिव शहरातील सांजा रोडवर तब्बल ६५ लाख रुपये किमतीचा आलिशान बंगला बांधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवस आधीच मुख्य आरोपी मयुर कुदळे, त्याची पत्नी शितल कुदळे आणि वडील महादेव कुदळे हे सर्वजण पुण्याला फरार झाले आहेत.
कंपनीचा वादग्रस्त पूर्वेतिहास
‘सुखमनी कंपनी’चा पूर्वेतिहासही वादग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. कंपनीचा एक संचालक २०२२ मध्ये अशाच एका प्रकरणात तुरुंगात गेला होता, तर कंपनीचा चेअरमन राजेंद्र सोपान जाधव (रा. हातमोळी, ता. तासगाव, जि. सांगली) हा देखील फरार आहे.
काय आहे प्रकरण?
‘सुखमनी कंपनी’चे चेअरमन राजेंद्र सोपान जाधव, फाउंडर लिडर मयुर कुदळे, शितल कुदळे आणि महादेव कुदळे (सर्व रा. सारोळा, ता. जि. धाराशिव) यांनी संगनमत करून ही फसवणूक केली. ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर १५ महिन्यांत ७० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. या प्रकरणी सुरेखा महेश लोहार (वय ३९, रा. कोर्ट कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ‘सुखमनी कंपनी’च्या संबंधित चौघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे (हितसंबंधांचे रक्षण) अधिनियम कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, फरार आरोपींना तातडीने अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.