धाराशिव: शहरात गुन्हेगारीचा आलेख वाढत असून, हप्ता वसुलीसाठी व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “येथे चहाचे दुकान चालवायचे असेल तर दर आठवड्याला १२,०० रुपये हप्ता द्यावा लागेल,” असे म्हणत एका गुंडाने दुकान मालक आणि कामगाराला बेदम मारहाण करून गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने पळवून नेली. ही घटना ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास बार्शी नाका, यशवंत नगर येथील ‘बोस्टन टी पार्टी’ अमृततुल्य दुकानात घडली.
याप्रकरणी सुजित राजेंद्र गुंडाळे (वय २८, रा. यशवंत नगर, बार्शी नाका, धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजित गुंडाळे यांचे यशवंत नगर भागात ‘बोस्टन टी पार्टी’ नावाचे अमृततुल्य चहाचे दुकान आहे. ३० जानेवारीला दुपारी आरोपी राहुल उर्फ छोट्या मरगु मंजुळे (रा. वडार गल्ली, धाराशिव) हा त्यांच्या दुकानात आला. त्याने सुजित यांना दमदाटी करत, “तुला इथे दुकान चालवायचे असेल तर दर हप्त्याला १२०० रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी केली.
सुजित यांनी विरोध केला असता, आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने सुजित गुंडाळे आणि त्यांच्या दुकानातील कामगार नरेश साळुंके यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आरोपीने दुकानाच्या गल्ल्यातील १,८३० रुपये बळजबरीने काढून घेतले आणि तिथून पळ काढला.
याप्रकरणी सुजित गुंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपी राहुल उर्फ छोट्या मंजुळे विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३०८(४) (खंडणी/लुटमार), ११९(१), ११५(२) (दुखापत करणे), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.







