धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, परंडा, वाशी आणि उमरगा तालुक्यांत वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना लाखोंचा फटका बसला आहे. बॅग कापून वृद्धाची रोकड, शेतातील कृषी पंप आणि बस स्थानकातून दुचाकी चोरून नेल्याच्या घटना घडल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परंड्यात वृद्धाची रोकड लंपास
परंडा शहरातील मिलन हॉटेलसमोरून जात असताना एका ८० वर्षीय वृद्धाची ७० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. सुदाम तुकाराम कदम (वय ८०, रा. चिंचपूर खुर्द) यांनी २ ऑगस्ट रोजी स्टेट बँक ऑफ इंडियामधून ७० हजार रुपये काढून आपल्या प्रवासी बॅगेत ठेवले होते. दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांची बॅग कापून आतील रक्कम चोरून नेली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशीत शेतकऱ्यांचे कृषी पंप चोरीला
वाशी तालुक्यातील कवडेवाडी शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ३० ते ३१ जुलै दरम्यान, दामोदर राजाराम कवडे, रामहरी किसन विधाते आणि रामलिंग भानुदास कवडे यांच्या मालकीचे एकूण ५३,००० रुपये किमतीचे पाच कृषी पंप आणि सोलर मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी दामोदर कवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
उमरग्यात बस स्थानकातून दुचाकी चोरी
उमरगा बस स्थानकातून एका प्रवाशाची मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. खय्युम रज्जाक बागवान (वय ३२, रा. खजुरी, जि. गुलबर्गा) हे ३० जून रोजी उमरगा बस स्थानकात आले होते. दुपारी साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान त्यांची होंडा सीडी ११० ड्रीम दुचाकी (क्र. केए ३२ ईएच ३५२६), अंदाजे किंमत २०,००० रुपये, अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी २ ऑगस्ट रोजी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिन्ही प्रकरणांमध्ये, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरोधात चोरीचे गुन्हे नोंदवले असून, अधिक तपास सुरू आहे.