धाराशिव: मंडळी, सरकारी तिजोरी म्हणजे काय? तर जिथे जनतेच्या पैशाचा हिशोब असतो, बरोबर? पण थांबा! धाराशिवच्या जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या गणिताचे नवे सूत्र वापरात आले आहे. इथे कोणत्याही कागदाला किंवा फाईलला पुढे सरकायचं असेल, तर त्याला आधी ‘लक्ष्मीदर्शन’ किंवा सोप्या भाषेत ‘वजन’ द्यावं लागतं, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
या अनोख्या ‘अर्थ’शास्त्राच्या म्होरक्या आहेत आपल्या जिल्हा कोषागार अधिकारी मॅडम! त्यांचे नाव काहीही असो, पण काम मात्र ‘टक्केवारी’शिवाय होत नाही, असं त्रस्त नागरिक दबक्या आवाजात बोलत आहेत. अहो, साधी मेडिकलची बिलं असोत, निवृत्तीची पेन्शन फाईल असो किंवा मोठ्या सरकारी कामांची बिलं… मॅडमच्या परवानगीच्या ‘स्पीडब्रेकर’वर टक्केवारीचा ‘टोल’ भरल्याशिवाय गाडी पुढे जातच नाही म्हणे!
‘चिरीमिरी द्या आणि काम घ्या’ या अलिखित नियमामुळे अनेकजण वैतागले आहेत. पण मॅडमचा रुबाब काही औरच! ‘माझं कुणी काय वाकडं करणार?’ अशा अविर्भावात त्या वावरत होत्या, असं सूत्रांकडून समजतं.
पण म्हणतात ना, ‘दिवस फिरले की सगळेच फिरतात!’ झालं असं की, काही मोठ्या पदावरच्या साहेबांची बिलं सुद्धा मॅडमच्या ‘फिल्टर’मध्ये अडकली. मग काय विचारता! त्या मोठ्या साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून शब्दांचा असा काही ‘झाप झाप झापलेला’ आहे की, मॅडमची सगळी हवाच गुल झाली!
मोठ्या साहेबांचा पारा चढलेला बघून मॅडमची भीतीने गाळण उडाली. मग काय, तात्काळ माफीनामा सादर! डोळ्यात (बहुतेक पश्चात्तापाचे?) दोन थेंब आणून आणि ‘सॉरी’ म्हणून मॅडमनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. ‘माझं कुणी वाकडं करू शकत नाही’ ही टिमकी तात्पुरती बंद झाली आहे.
आता खरी गंमत पुढे आहे. मोठ्या साहेबांनी झापल्यावर मॅडम नरमल्या खऱ्या, पण सामान्य माणसाच्या फाईलला आतातरी ‘वजना’शिवाय गती मिळणार का? की हा ‘अर्थ’पूर्ण खेळ असाच सुरू राहणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल! तोपर्यंत, धाराशिवकरांनो, आपली फाईल देताना जरा ‘वजन’ तपासून घ्या! 😉