धाराशिव – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरु झाली आहे. त्यात चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी दांडी मारल्याने या चर्चेला अधिक ऊत आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी काही दिवसापूर्वी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा पसरली होती. मात्र सुनील चव्हाण सध्या आजारी असून, शुगर वाढल्याने त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत.
त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापुरात भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस हे सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता, भाजपवासी झालेले बसवराज पाटील यांच्यासमवेत मधुकर चव्हाण यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
त्यातच धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी मधुकर चव्हाण यांनी दांडी मारल्याने या चर्चेला अधिक ऊत आला आहे. मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण, बाबुराव चव्हाण हेही ओमराजेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना गैरहजर राहिल्याने या चर्चेत अधिक भर पडली आहे.
आपण वैयक्तिक कामाकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचा खुलासा मधुकर चव्हाण यांनी केला आहे. मात्र त्यांचा हा खुलासा कार्यकर्त्यांना पटत नसून फडणवीस यांच्या भेटीमागे नेमकं दडलंय काय ? हा प्रश्न विचारला जात आहे.
कोण आहेत मधुकर चव्हाण ?
मधुकर चव्हाण हे तुळजापूर मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. १९९० मध्ये सर्वप्रथम ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ असे चार वेळा सलग निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता , तेव्हापासून ते राजकीय विजनवासात आहेत.
चव्हाण यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पंचायत समिती सदस्यापासून झाली. लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दुग्धविकास व पशूसंवर्धनमंत्री, विधानसभेचे उपसभापती, अशी अनेक पदे भूषविली आहेत. त्यांचे वय सध्या जवळपास ८७ वर्षे असून, अजूनही त्यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे राजकीय वारसदार सुनील चव्हाण यांच्यासाठी मधुकर चव्हाण यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते.