धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या रेल्वे मार्गा च्या एकूण ११० किमी लांबी पैकी धाराशिव ते तुळजापूर या ४१.४ किमी लांबीच्या रेल्वे लाइन च्या कामाची रु.४८७ कोटींची निविदा अंतिम झाली असून लवकरच या कामास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या रेल्वेमार्गामुळे धाराशिव जंक्शन होणार असून आई तुळजाभवानीचे तूळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटणाला नवी दिशा मिळणार असून रोजगार निर्मिती व अर्थकरणाला मोठी चालना मिळणार आहे.
सन २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाचे भूमीपूजन केले होते. मात्र ठाकरे सरकारच्या काळात या रेल्वे मार्गासाठी निधी न दिल्याने या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. तद्नंतर राज्यात महायुती सरकार सत्तेत येताच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या कामासाठी राज्य सरकारचा वाटा रु. ४५२ कोटी मंजूर करण्यात आला होता.
ठाकरे सरकारच्या काळात जवळपास २.५ वर्षाचा कालावधी गेल्याने प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी मध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सदरील कामाचे तीन टप्पे करण्याचे सूचित केले होते. त्या अनुषंगाने कामाचे तीन भाग करण्यात आले असून आता यातील पहिल्या टप्प्यांची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. पुढील दोन टप्याची प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार असून यामुळे सुरुवातीला ५ वर्षे असलेला कामाचा कालावधी २.५ वर्षावर आला आहे.
सदर निविदेमध्ये एकूण लांबी पैकी ४१.४ किमी चे काम करण्यात येणार आहे. त्यात २० किमी च्या सिंगल लाईन चे तर १०.१७ किमी डबल लाईंनचे काम करण्यात येणार आहे. या लांबी मध्ये तुळजापूर, वडगाव व सांजा या ३ रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म, ८ मोठे पुल, १० लहान पुल, ८ रोड ओव्हर ब्रिज या कामांचा समावेश आहे. ही कामे फास्ट ट्रॅक वर करण्यात येणार आहेत. या कामासाठी रु. ५४४ कोटींची तरतूद करण्यात आली होती. सदरील निविदा १० % कमी दराने रु. ४८७ कोटीत अंतिम करण्यात आली असून लवकरच दुसऱ्या टप्प्यातील निविदा अंतिम होऊन सोलापूर तुळजापूर या मार्गाचे काम देखील सुरू करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.