धाराशिव: अनेक वर्षांपासून रखडलेल्या धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. मात्र, राज्य सरकारने वेळेत निधी उपलब्ध न केल्याने या प्रकल्पाची किंमत तिप्पट वाढली आहे. ९०० कोटींऐवजी आता ३००० कोटी रुपये खर्च येणार आहेत. यात धाराशिव रेल्वेस्थानक प्रस्तावित होते त्यापेक्षा तिप्पट मोठे होणार असून प्रवाशांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम देखील मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे. सोलापूर शहरातील जमिनीचा दर वाढल्याने भूसंपादनासाठी तब्बल १ हजार कोटी रुपयांचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वाढीव निधीची मागणी केली आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
प्रकल्पाच्या किंमती वाढीचे कारण
या प्रकल्पाचे काम मागील अडीच वर्षांपासून रखडले होते. याचे कारण म्हणजे तत्कालीन ठाकरे सरकारने राज्याच्या हिश्श्याचा निधी दिला नव्हता. त्यामुळे प्रकल्पाच्या किंमतीत ११७.४९% म्हणजेच रु.१०६३.२३ कोटींची वाढ झाली आहे.
नवीन रेल्वेस्थानकात असणार सुविधा
धाराशिव रेल्वेस्थानक आता अधिक सुसज्ज आणि अद्ययावत होणार आहे. मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत ४००० चौरस मीटरवरून तब्बल १२,६३० चौरस मीटरची होणार आहे. म्हणजेच, मुख्य रेल्वेस्थानकाची इमारत तिप्पट मोठी होणार आहे. तसेच, जलदगती गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग (लूप लाईन) तयार करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली निधीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून सुधारित किंमतीनुसार केंद्राच्या वाट्याचा निधी लवकर देण्यात यावा, अशी मागणी केली आहे.