धाराशिव – रमजान ईदच्या पवित्र दिवशी धाराशिव (उस्मानाबाद) येथील ईदगाह मैदानावर नमाज पठणाच्या वेळी दोन खाजगी ड्रोन कॅमेरे विनापरवाना उडवल्याने प्रार्थनेत व्यत्यय आल्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत शहरातील मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर नमाज पठण आणि त्यानंतर खुतबा (धार्मिक प्रवचन) ऐकणे अनिवार्य असते. मात्र, यावेळी पोलीस प्रशासनाचा एक अधिकृत ड्रोन असतानाही, दोन खाजगी ड्रोन कॅमेरे परवानगीशिवाय अत्यंत खालच्या पातळीवरून उडवण्यात आले.
या ड्रोनच्या आवाजाने आणि पंख्याच्या हवेमुळे नमाज पठण करणाऱ्यांची एकाग्रता भंग झाली आणि धार्मिक प्रार्थनेत अडथळा निर्माण झाला, असे तक्रारीत नमूद केले आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या कुटील हेतूने हा प्रकार मुद्दाम घडवून आणल्याचा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ड्रोन खाली कोसळल्यास लहान मुले, वृद्ध किंवा इतर नमाजी व्यक्तींना गंभीर इजा होण्याची शक्यता होती, ज्यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली असती. बीड जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनेचा संदर्भ देत, अशा ड्रोनचा वापर समाजकंटकांकडून हल्ला करण्यासाठीही केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या खाजगी ड्रोन कॅमेऱ्यांना कोणी परवानगी दिली, हे कॅमेरे उडवणारे व्यक्ती कोण होते आणि त्यांचे मालक कोण आहेत, याची सखोल चौकशी करून विनापरवाना ड्रोन वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांनी केली आहे. या निवेदनावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत. या तक्रारीनंतर प्रशासन ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.