धाराशिव: धाराशिव नगरपालिकेला नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना कंत्राटदारांच्या हव्यासामुळे जाणूनबुजून अडथळा येत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या निधीच्या रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजीच प्राप्त झाली होती. नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही या कामांना सुरुवात झालेली नाही.
दि. 6 जानेवारी 2025 रोजी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यांची कामे तत्काळ चालू करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनावेळी धाराशिव नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. तथापि, या आंदोलनानंतर सात महिन्यांपासून रखडलेली निविदा उघडण्यात आली.
महाविकास आघाडीने आरोप केला आहे की, कंत्राटदारांकडून 15 ते 16 टक्के जास्तीच्या दराने निविदा मंजूर करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या आडून कंत्राटदार प्रशासनावर दबाव आणत असून, या निविदांमुळे नगर परिषदेला जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देऊन तात्काळ कामांना सुरुवात करावी, अन्यथा दि. 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल.
महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे की, तात्काळ याची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अन्यथा प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.