धाराशिव: सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामासाठी वरूडा (ता. धाराशिव) येथील साठवण तलावातून गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कामात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कंत्राटदाराला मदत करत असल्याचा गंभीर आरोप करत, दोघांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला आहे.
केशेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लहू रामा खंडागळे यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. अर्जानुसार, सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी ‘आयएससी प्रोजेक्ट्स – जीपीटी जेव्ही, पुणे’ या कंपनीला वरूडा साठवण तलावातून गौण खनिज (माती, मुरुम) उचलण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाने काही अटी व शर्तींवर परवानगी दिली आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार या अटी व शर्ती पायदळी तुडवत असल्याचे अर्जात म्हटले आहे.
तक्रारीतील प्रमुख मुद्दे:
- सीमांकनाबाहेर खोदकाम: परवानगी दिलेल्या क्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जात आहे.
- असमान खोलीकरण: तलावाचे खोलीकरण सर्व ठिकाणी समान पातळीवर करण्याऐवजी काही ठिकाणी धोकादायकरित्या खोल खड्डे खोदले जात आहेत.
- रात्रंदिवस उत्खनन: नियमानुसार केवळ सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत काम करण्याची परवानगी असताना, कंत्राटदार २४ तास, अगदी रात्रीच्या वेळीही खोदकाम करत आहे. (याबाबतचे छायाचित्र अर्जासोबत जोडण्यात आले आहे.)
- रस्त्यांची दुर्दशा व अपघात: गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे धाराशिव-वरूडा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून, यामुळे दररोज अपघात होत आहेत. तसेच, वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही.
- रस्त्याला धोका: तलावाच्या बाजूने जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून (९ फुटांपेक्षा कमी अंतर सोडून) खोदकाम केले जात असल्याने, भविष्यात रस्ता खचण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
- अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष: कामावर पाटबंधारे विभाग किंवा इतर संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांची उपस्थिती नसते. उलट, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कंत्राटदारास मदत करत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
या सर्व गैरप्रकारांची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी श्री. खंडागळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रती माहिती व पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार, जिल्हा जलसंधारण अधिकारी आणि मध्य रेल्वेच्या उप मुख्य अभियंत्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.