धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पवनचक्क्यांमधील मौल्यवान तांब्याच्या तारा चोरून कंपन्यांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील एकूण ७ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून १२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मार्च २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गंधोरा पाटी येथे रिन्यू कंपनीच्या पवनचक्की परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना बांधून ठेवत मारहाण केली होती. त्यानंतर त्यांनी पवनचक्कीतील तांब्याच्या तारा बळजबरीने चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व पारंपरिक पद्धतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी:
- सुनील कालिदास शिंदे (वय ३६, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. जि. धाराशिव)
- सरदार उर्फ गणेश शंकर काळे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव, ह. मु. येळंब घाट, ता. जि. बीड)
- राहुल लाला शिंदे (वय २९, रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. जि. धाराशिव)
या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी हा गुन्हा इतर ८ साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. इतकेच नव्हे, तर धाराशिव जिल्ह्यात यापूर्वी दाखल असलेल्या अशाच प्रकारच्या आणखी ६ गुन्ह्यांची कबुलीही त्यांनी दिली.
आरोपींकडून पोलिसांनी एकूण ७२१ फूट लांबीची तांब्याची तार आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो गाडी असा एकूण १२ लाख २३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आणि जप्त मुद्देमालाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक. संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फहरान पठाण, दयानंद गादेकर, पोअं योगेश कोळी आणि चालक नितीन भोसले यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.