धाराशिव: ‘तू आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला का जातेस’ या कारणावरून एका ५० वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून, लाथाबुक्यांनी व मोबाईलने डोक्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील रमाई नगर परिसरात घडली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी लक्ष्मी वसंत गायकवाड (वय ५०, रा. रमाई नगर, तेरणा कॉलेज जवळ, धाराशिव) यांनी दि. २३ ऑक्टोबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, आरोपी मिना अंधारे, राणी अंधारे आणि विनोद अंधारे (सर्व रा. रमाईनगर, तेरणा कॉलेज जवळ, धाराशिव) यांनी संगनमत करून दि. २१ ऑक्टोबर सायंकाळी साडेसहा ते दि. २३ ऑक्टोबर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी लक्ष्मी गायकवाड यांना ‘तू आमच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला का जातेस’ असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली.
तसेच, आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि मोबाईलने डोक्यात मारून जखमी केले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी देखील दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी लक्ष्मी गायकवाड यांच्या प्रथम खबरेवरून, आनंदनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ११८(१), ३(५) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






