धाराशिव: धाराशिवच्या राजकारणात सध्या ‘चप्पल’ हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. निमित्त ठरलंय, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केलेला एक ‘हट-के’ निर्धार. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालायची नाही, अशी ‘भीष्म प्रतिज्ञा’ त्यांनी केली आहे. नुसती प्रतिज्ञाच नाही, तर पाटील सध्या जिल्हाभर खरोखरच ‘अनवाणी’ पायाने फिरत आहेत.
नेमकं घडलं काय?
झालं असं की, धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीने शेतकऱ्याचं उभं पीक, फळबागा सगळं काही ‘हातचं’ गेलं. शेतकऱ्यावर ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याची वेळ आली. सरकारने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा तर केली, पण अंमलबजावणी काही झाली नाही. सरकारच्या याच ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेचा राग मनात धरून, संजय पाटलांनी स्वतःला ‘आत्मक्लेश’ करून घेण्याचा निर्णय घेतला आणि सरळ चपला बाजूला ठेवल्या.
पण, थांबा… इथंच तर ‘ट्विस्ट’ आहे!
संजय पाटील दुधगावकर आणि ‘चप्पल’ यांचं नातं हे आजचं नाही, ते जरा जुनं, ऐतिहासिक आणि तितकंच ‘आक्रमक’ आहे! गेली २५ वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या पाटलांनी शिवसेना, काँग्रेस, भाजप असा ‘प्रदीर्घ’ प्रवास करत आता राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी म्हणत राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली आहे.


जेव्हा ते काँग्रेसमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, तेव्हाची एक आठवण आजही जिल्ह्यात ‘चवीने’ सांगितली जाते. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक (पूर्वीचे डॉ. पदमसिंह पाटील आणि आताचे आमदार राणा पाटील) यांच्यासोबत त्यांचा ३६ चा आकडा आहे. एकेकाळी ‘तेरणा’ कारखान्याच्या सभेत, संजय पाटलांनी थेट डॉ. पदमसिंह पाटलांच्या दिशेने ‘चप्पल फिरकावल्याचा’ किस्सा चांगलाच गाजला होता.
आता नियतीचा खेळ बघा! एकेकाळी ज्यांनी ‘चप्पल फेकून’ आपला संताप व्यक्त केला होता, तेच संजय पाटील आज शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ‘चप्पल सोडून’ रस्त्यावर उतरले आहेत. राजकारणातील हा ‘चप्पल-चमत्कार’ पाहून धाराशिवकरही क्षणभर चक्रावले आहेत.
‘हट-के’ आंदोलनाचे ‘बादशाह’!
संजय पाटलांची आंदोलनं नेहमीच ‘जरा हटके’ असतात. याआधीही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ‘काळे आकाश कंदील’ आणि ‘काळे फुगे’ फोडून अनोखं आंदोलन केलं होतं. आता त्यात या ‘अनवाणी’ सत्याग्रहाची भर पडली आहे.
सध्या तरी पाटील अनवाणी पायाने फिरत आहेत. त्यांच्या या ‘आत्मक्लेशाने’ सरकारला पाझर फुटणार का? आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पण एक मात्र खरं, पाटलांच्या या ‘चप्पल-त्यागा’मुळे धाराशिवच्या राजकारणातला ‘बोचरा’पणा मात्र चांगलाच वाढला आहे!
View this post on Instagram





