धाराशिव: बेकरी मशीन (आहन व इतर साहित्य) आणून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सोलापूर येथील एका व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी भाग्यश्री विठ्ठल लांडगे (वय २६, रा. पाडोळी आ., ता. जि. धाराशिव) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. आरोपी बिजली मेहतो (रा. सोलापूर) याने भाग्यश्री यांचा विश्वास संपादन केला. त्याने ‘तुम्हाला बेकरीसाठी लागणारी मशीन व इतर साहित्य आणून देतो’ असे सांगितले.
त्यानुसार, दि. २३ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास युनियन बँक, धाराशिव येथे आरोपी मेहतो याने भाग्यश्री यांच्याकडून आरटीजीएस (RTGS) आणि फोनपे द्वारे एकूण १२ लाख ५० हजार रुपये स्वीकारले. मात्र, पैसे घेऊनही आरोपीने आजतागायत कोणत्याही प्रकारची मशिनरी फिर्यादीस दिली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भाग्यश्री लांडगे यांनी मंगळवार, दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी बिजली मेहतो याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





