धाराशिव: अज्ञात दोन मोटारसायकल स्वारांनी एका महिलेला पोलिस असल्याची बतावणी करून तिच्याकडून 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लुटल्याची घटना धाराशिव शहरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगल दिलीप देशमुख (वय 59, रा. देवळाली ता. जि. धाराशिव) या दि. 17.02.2025 रोजी दुपारी 1.45 वाजता सु. अहिल्याबाई होळकर उड्डाणपूल सर्विस रोड अमरपॅलेसजवळून जात होत्या. त्यावेळी अज्ञात दोन इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांना आम्ही पोलीस आहोत, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी मंगल देशमुख यांच्या हातातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र (अंदाजे 20,000 रुपये किमतीचे) हिसकावून घेतले आणि फसवणूक करून पसार झाले.
या घटनेनंतर मंगल देशमुख यांनी दि. 18.02.2025 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भा. न्या. सं. कलम 319, 205, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
दुकानात चोरी, १ लाखावर ऐवज लंपास
तुळजापूर – तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी एका दुकानातून १ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
प्रकाश वसंत पौळ (वय ४६) यांच्या मालकीचे न्यू श्रीफळ एजन्सी नावाचे दुकान आहे. १६ फेब्रुवारीच्या रात्री ९.३० ते १७ फेब्रुवारीच्या सकाळी ७.३० च्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून एचपी कंपनीचा लॅपटॉप, रेडबुल एनर्जी ड्रिंकचे ८ बॉक्स, मॉन्स्टर एनर्जी ड्रिंकचे ९ बॉक्स आणि रोख रक्कम ८० हजार रुपये असा एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा माल चोरून नेला.या घटनेची माहिती प्रकाश पौळ यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ट्रकमधील कपड्याचे फ्रॉक चोरीस
वाशी: वाशी येथे अज्ञात व्यक्तीने एका ट्रकमधील कपड्याचे फ्रॉक चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीकांत रामलिंगाप्पा जालिकट्टी (वय २७) हे दि. १६.०२.२०२५ रोजी रात्री ८.३० ते ८.४५ च्या सुमारास वाशी येथे घुलेचा माळ ते पार्डी फाटा येथून ट्रकमध्ये माल भरून जात होते. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या ट्रकमधील कपड्याच्या फ्रॉकचे ३० नग आणि एक फ्रॉक असा एकूण १२ हजार ८१५ रुपये किमतीचा माल चोरून नेला.
या घटनेची तक्रार श्रीकांत जालिकट्टी यांनी वाशी पोलीस ठाण्यात दि. १८.०२.२०२५ रोजी दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
विहिरीतून पाणबुडी मोटारची चोरी
परंडा: परंडा तालुक्यातील शिराळा शिवारात एका विहिरीतून अज्ञात व्यक्तीने पाणबुडी मोटार चोरून नेल्याची घटना घडली आहे. हनुमंत मारुती चौधरी (वय ६०, रा. वडणेर, ता. परंडा, जि. धाराशिव) यांची टर्बो कंपनीची ५ एचपीची पाणबुडी मोटार व केबल, ज्याची किंमत अंदाजे १० हजार रुपये आहे, ती १५.०२.२०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० च्या दरम्यान शिराळा शिवारातील विहिरीतून चोरी झाली.
या घटनेची तक्रार हनुमंत चौधरी यांनी परंडा पोलीस ठाण्यात दि. १८.०२.२०२५ रोजी दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
राहत्या घरासमोरून मोटरसायकलची चोरी
तामलवाडी: तामलवाडी येथे एका व्यक्तीच्या राहत्या घरासमोरून त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सतीश मच्छिंद्र माळी (वय ४८, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक एमएच २५ एआर ९४०१), ज्याची किंमत अंदाजे ४० हजार रुपये आहे, ती १५.०२.२०२५ रोजी रात्री १० ते १६.०२.२०२५ रोजी सकाळी ६ च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
या घटनेची तक्रार सतीश माळी यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात दि. १८.०२.२०२५ रोजी दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
सावरगाव प्लांटमधून १ लाख ८९ हजारांची केबल चोरी
तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील परांजपे प्राईड प्रा. लि. च्या प्लांटमधून १ लाख ८९ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६ या वेळेत अज्ञात व्यक्तीने प्लांटमधील इनव्हर्टरची वायर कट करून सोलार प्लेटच्या खाली कनेक्शन असलेली कॉपर केबल चोरून नेली. या चोरीत एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची तक्रार एनरिच एनर्जी प्रा. लि. सावरगावचे व्यवस्थापक गोकुळ काशीनाथ गुंजाळ (वय २९, रा. मालेगाव ता. बार्शी जि. सोलापूर) यांनी १८ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.