धाराशिव: येडशी येथील गौरी कला केंद्राचे चालक बालाजी नानासाहेब भराडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि लाकडाने मारहाण करून फ्रॅक्चर केल्याप्रकरणी तीन भावांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बालाजी नानासाहेब भराडे (वय ४४, रा. आळणी, ता. जि. धाराशिव) हे ३० जुलै रोजी येडशी येथील त्यांच्या गौरी कला केंद्राबाहेर असताना, आरोपी शांतीलाल सायबा पवार, सुनिल सायबा पवार आणि रमेश सायबा पवार (सर्व रा. कसबे तडवळा, ता. जि. धाराशिव) यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी भराडे यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी वस्तूने मारहाण केली, ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर झाले.
यावेळी आरोपींनी भराडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या मालकीच्या एर्टिगा गाडीच्या बोनेटवर मारून गाडीचेही नुकसान केले. या घटनेप्रकरणी बालाजी भराडे यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शांतीलाल पवार, सुनिल पवार आणि रमेश पवार या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.