विसर्जनाचा धुरळा खाली बसलाय आणि बाप्पा पुढच्या वर्षी परत येण्याचं वचन देऊन गेलेत. धाराशिवच्या गल्लोगल्लीत दहा दिवस घुमणारा “गणपती बाप्पा मोरया”चा गजर आता शांत झालाय. पण ही शांतता फसवी आहे, वादळापूर्वीची आहे. कारण बाप्पांच्या आगमनाने जे उत्साहाचे ढोल-ताशे वाजायला सुरुवात झाली होती, ती फक्त एका उत्सवाची नांदी नव्हती, तर तब्बल तीन वर्षांपासून मुके झालेल्या राजकीय आखाड्याच्या उद्घाटनाची तयारी होती.
गेली तीन वर्षे जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांवर प्रशासकांचा राज होता. सगळा कारभार शांत, थंड आणि ‘नियमात’ चालला होता. ना कसला आरडाओरडा, ना कुणाचा राजकीय ‘राडा’. नेतेमंडळींचा जीव नुसता कासावीस झाला होता. कार्यकर्ते थंड बस्त्यात पडून होते. सत्ता नावाच्या अत्तराची बाटली प्रशासकाच्या टेबलावर बंद होती, तिचा सुगंध घेता येत नव्हता आणि दरवळही. अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवले होते, “देवा, कधी एकदा ही निवडणुकीची घंटा वाजतेय!” अखेर तो कौल बाप्पांनीच दिला. गणेशोत्सवाच्या रूपात इच्छुकांसाठी जणू ‘लॉन्चिंग इव्हेंट’च पार पडला.
प्रभागातल्या ज्या ‘दादां’ना, ‘भाऊं’ना गेल्या तीन वर्षांत कुणी साधं विचारलं नव्हतं, त्यांच्याभोवती अचानक कार्यकर्त्यांचा गराडा पडू लागला. ज्या मंडळांना वर्गणीसाठी फिरावं लागायचं, तिथे यावर्षी देणग्यांचे चेक स्वतःहून चालत आले. वर्गणीच्या पावती पुस्तकापेक्षा इच्छुकांची यादीच मोठी होती. कुणी नगरसेवकपदासाठी कंबर कसली होती, कुणी पंचायत समिती सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलं होतं, तर काहींची नजर थेट जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर होती.
उत्सव काळात तर या इच्छुकांनी भक्तीचा नाही, तर प्रचाराचा महापूर आणला. आरतीच्या वेळी देवाच्या मूर्तीकडे कमी आणि समोर उभ्या असलेल्या ‘मतदार’ नावाच्या देवाकडेच जास्त लक्ष होतं. कुणी ढोलाच्या तालावर असा काही ठेका धरला की जणू काही विजयाचाच जल्लोष करत आहेत. त्यांच्या खांद्यावर उपरणं नाही, तर भविष्यातल्या सत्तेचं ओझं नाचत होतं. कुणी भव्य महाप्रसादाचा घाट घातला, तर कुणी महिलांसाठी हळदी-कुंकू आणि लहान मुलांसाठी स्पर्धांचं आयोजन केलं. बक्षिसांच्या रकमेत मतांची गणितं लपली होती आणि वाटल्या जाणाऱ्या प्रत्येक पुरणपोळीत राजकीय गोडवा मिसळला होता.
आता तर खेळ आणखी मोठा झालाय. नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार! म्हणजे आता फक्त नगरसेवकांना खिशात घालून भागणार नाही, आता थेट ‘जनता-जनार्दन’च्या मनावर राज्य करावं लागेल. एकेका वॉर्डापुरती मर्यादित असलेली ‘फिल्डिंग’ आता शहराच्या आणि गावाच्या कानाकोपऱ्यात लावावी लागणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या पदांसाठी तयारी करणारे कार्यकर्तेही आता ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आलेत.
उत्सव संपलाय, मांडव उतरले गेलेत. गणपतीच्या मूर्तीची जागा आता लवकरच ‘दादा’, ‘भाऊ’, ‘साहेब’ यांचे हसरे चेहरे असलेले मोठमोठे बॅनर्स घेतील. एकमेकांना श्रीफळ देणारे हात आता एकमेकांचे राजकीय ‘कार्यक्रम’ कसे करायचे याच्या नियोजनात गुंतले आहेत. बाप्पांच्या आगमनाने सुरू झालेला हा राजकीय उत्साह आता खरा रंग दाखवणार आहे.
तीन वर्षांचा राजकीय वनवास संपवून सत्तेच्या मैदानात उतरण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. ढोल-ताशांचा गजर थांबला असला तरी, आता आरोप-प्रत्यारोपांचे, आश्वासनांचे आणि डावपेचांचे आवाज घुमतील. धाराशिवचा राजकीय फड आता खऱ्या अर्थाने तापायला लागला आहे. पुढचे काही महिने फक्त धुरळा उडणार… तोही निवडणुकीचा!