धाराशिव शहराच्या स्वच्छतेच्या नावाखाली तब्बल ८ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. बारामतीच्या एका श्रीमंत कंत्राटदाराला घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर देण्यात आले, मात्र हा ठेकेदार धाराशिवला फिरकलाही नाही! फक्त दोन कामगारांच्या भरोशावर संपूर्ण शहराची स्वच्छतेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्याची स्वप्ने दाखवून नागरिकांना अक्षरशः कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ढकलले जात आहे.
कंत्राटदाराचा बेफिकीरपणा आणि नगरपालिकेची ढिम्म प्रशासनाची ढिलाई!
करारानुसार शहरात २४० कामगार तैनात करण्याचे आश्वासन होते, पण प्रत्यक्षात ४० कामगारही दिसत नाहीत. हे कामगार कोणते, कुठे आहेत, याचा काहीच मागमूस नाही. कागदावरच स्वच्छता मोहीम सुरू आहे, पण शहरातील गल्लीबोळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी भरलेले आहेत. घंटागाड्या गायब झाल्यामुळे नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकावा लागत आहे. गटारांची सफाई न केल्यामुळे दुर्गंधी आणि रोगराईचा संसर्ग वाढत आहे.
दर महिन्याला ७२.५० लाखांचा कचरा!
स्वच्छतेसाठी दर महिन्याला अंदाजे ₹७२.५० लाख खर्च केला जातो. मात्र, ठेकेदाराच्या बोगस हजेरी रजिस्टर आणि खोट्या बिलांच्या आधारे ₹५० ते ₹५५ लाखांचे बिल सादर केले जाते. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या गैरप्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे.
भ्रष्टाचाराचा किल्ला फोडा!
नगरपालिकेतील मुख्याधिकारी , संबंधित अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांचे साटेलोटे स्पष्टपणे दिसत आहे. कोणाला किती टक्केवारी मिळते, याचा हिशोबही सुसंगत आहे. धाराशिवच्या जनतेच्या पैशाचा असा गैरवापर होऊनही प्रशासन झोपलेले आहे!
धाराशिवकरांनी आवाज उठवा!
धाराशिवच्या नागरिकांनी आता या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाची पायमल्ली करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना धडा शिकवला पाहिजे. प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे शहराची वाट लागली आहे. यावर तातडीने कारवाई न केल्यास धाराशिवकर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार का?