भावड्या – आरं , हे पक्या ओमदादाचं कालचं कानेगावचं भाषण ऐकलं का ?
पक्या – तेच की ‘बॉयलर कोंबडीचे अंडे’ अन ‘जर्शी गाईचं वासरु ‘… .
भावड्या – हा हा .. तेच ते.. लय धुतलं बघ…
पक्या – च्या मारी, सावंत साहेब आन ओमदादाचं लैच पेटलंय म्हण की . ..
भावड्या – इतकंच काय तर पहिल्यांदा ‘खेकडा मंत्री’ म्हणाले..
पक्या – नाय तर तुम्ही सगळे म्हणत व्हताच की …
भावड्या – आम्ही म्हणत व्हतो रे, पण दादा पण म्हणल्यामुळे आम्ही लैच खुश झालोय…
पक्या – यात खुश होण्यासारखं काय हाय ?
भावड्या – यालाच म्हणतात कडवट शिवसैनिक… जश्यास तसे… ठोसास ठोसा..
पक्या – पण इतकं पेटण्यासारखं काय झालं म्हणायचं ?
भावड्या – ढोकीच्या सभेत राजे साहेबाबद्दल बोलले ते बोलले पण बार्शीत लईच गरळ ओकली बघ ….
पक्या – फडणवीस साहेबासमोर केलेलं तेच भाषण की , माझा बाप मेलाय S … राजकरण केलं जातंय ..
भावड्या – राजेसाहेबाबदल बोललेलं आता ओमदादा खपवून नाय घेणार …
पक्या – बरं , म्या एक इचारू का ?
भावड्या – इचार की , त्यात कसली भीती …
पक्या – राजेसाहेबांची हत्या होवून आज १८ वरीस झाले, पण निकाल का लागत नाय रं ?
भावड्या – ओमदादांनी तेच चॅलेंज केलंय , एक महिन्यात निकाल लावा अन दूध का दूध आन पाणी का पाणी करा.. .
पक्या – पण यात सावंत साहेबांचा काय संबंध ?
भावड्या – मग त्यांनी मध्ये कश्याला पडायचं ?
पक्या – हे तर असं , ऊस पाटलांचा अन भांडण कोल्हाचं …
भावड्या – ओमदादांनी डॉ. पाटलांना आन राणा पाटलांना गार केलंय ..
पक्या – मग सावंत साहेब , किस झाड की पत्ती है ? हेच कि…
भावड्या – अगदी बरुबर बोललास बघ…
पक्या – विकासाच्या मुद्यावर कुणीच बोलत नाय बघ… एकमेकांना नुसते जोडे मारताहेत…
भावड्या – इलेक्शन म्हटलं की असं चालायचं बाबा …
पक्या – यामुळेच आपण मागे आहोत, आता आपला जिल्हा नंबर ३ वरून १ वर येतो की काय ?
भावड्या – यासाठीच आपणास बदल करायला हवा…
(तेवढ्यात बाहेर, प्रचाराचा भोंगा वाजतो – घड्याळ तेच , वेळ नवी …भावड्या घड्याळाला शिव्या देत निघून जातो… )
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )