पक्या – आरं ये बंड्या, इतक्या सकाळी – सकाळी गरबडीत कुठं निघालास रं ?
बंड्या – कुठं म्हंजी… ताईच्या प्रचाराला… आता घड्याळ लैच पळणार बघ….
पक्या – ऑ , तू तर घड्याळाचा प्रचार करणार नव्हतास ना… मग आता कसा काय अचानक मूड बदलला ?
बंड्या – आरं परवा ढोकीत शिवसैनिकांची मिटिंग झाली, सावंत साहेबांनी बजावून सांगितलंय , सगळ्यांनी युतीधर्म पाळायचा …
पक्या – मग आतापर्यंत कुठं गेला होता युतीधर्म ? सीना – कोळेगावच्या धरणात बुडाला व्हता की काय ?
बंड्या – आरं , आमच्या धनु भाऊंना उमेदवारी मिळाली नाय म्हणून साहेब नाराज व्हते,,,
पक्या – मग शेवटी मिळाली का धनु भाऊंना उमेदवारी ?
बंड्या – तू पण आता आमची टांग खेच … आरं आता कसं मिळेल उमेदवारी, आता झालं गेलं विसरून कामाला लागायचं …
पक्या – म्हंजी दादांनी तुम्हाला शेवटी चॉकलेट दिलं म्हणायचं …
बंड्या – चॉकलेट, बिकलेट काय नाय,,शिवसैनिकांचा सन्मान राखायचा असं ठरलंय …
पक्या – म्हंजी नेमकं कसं ?
बंड्या – सावंत साहेबांना मानणारे शिवसैनिक आपल्या स्टाईलने प्रचार करतील. त्यांना राणा दादांनी स्वतंत्र यंत्रणा द्यायची…
पक्या – मग काय आता, तुझी चंगळ हाय म्हणायची…
बंड्या – सगळी धनु भाऊंची कृपा… ते जिकडे , तिकडे आम्ही …
पक्या – बरं मला एक सांग, तुम्ही सगळे गाड्या घेऊन मुंबईला गेला व्हता,,तरी पण काहीच कसं झालं नाही रं ?
बंड्या – आमची ताकद दाखवण्यासाठी गेलो व्हतो… पण सीएम साहेब म्हटले , थोडे दिवस संयम राखा ..
पक्या – तरी पण धाराशिवच्या ताईच्या रॅलीत सावंत साहेबांचा संयम कसा काय सुटला रं ? अजित दादासमोर लैच फडाफड बोलले की ..
बंड्या – त्यासाठीच ढोकीत मिटिंग ठेवली व्हती… राणा दादा, बसवराज आण्णा , सुनील मालक पण आले व्हते…
पक्या – मग झाली का तुमची दिलजमाई ? धनु भाऊं मग काय म्हणतात ?
बंड्या – म्हणून तर प्रचाराला निघालोय… येतो मी…
( या सदराचे लेखक आहेत, धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे )