ढोकी – ढोकी येथे आढळलेल्या पक्षी मृत्यूंचे कारण बर्ड फ्लू (H5N1) असल्याचे भोपाळ प्रयोगशाळेच्या चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर संभाव्य संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अंतर्गत संपूर्ण १० किलोमीटर परिसराला सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. यामुळे या भागातील पोल्ट्री व्यावसायिक, पशुपालक आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
जलद प्रतिसाद दलाची (RRT) कारवाई:
प्रभावित भागात संसर्ग रोखण्यासाठी जलद प्रतिसाद दलाची (RRT) नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय, वनविभाग आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने, आरोग्य विभागाने सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे.
५ प्रभागांमध्ये विभागणी करून काल (५ मार्च) रात्री उशिरापर्यंत कुक्कुट पक्षांचे निःसंशय नष्टिकरण (कलिंग) करण्यात आले. एकूण २९५ कुक्कुट पक्ष्यांना वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. आज (६ मार्च) देखील ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
संसर्गाचा धोका आणि नागरिकांना आवाहन:
बर्ड फ्लू हा अत्यंत संसर्गजन्य रोग असल्याने तो इतर पक्षी, प्राणी तसेच मानवांमध्येही पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे परसबागेत किंवा पोल्ट्री व्यवसायात असलेल्या पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे पशुसंवर्धन विभागाने सांगितले आहे.
नुकसान भरपाई:
ज्या पशुपालक किंवा व्यावसायिकांचे कुक्कुट पक्षी विल्हेवाट लावण्यात येणार आहेत, त्यांना शासकीय नियमानुसार नुकसानभरपाई थेट लाभ हस्तांतरण (DBT) स्वरूपात दिली जाईल.
प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन:
या संकटाच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी सांगितले आहे.