धाराशिव: धाराशिव तालुक्यातील रुई (ढोकी) शिवारात दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या अज्ञात तरुणीच्या जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. मयत महिलेची ओळख पटली असून, हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातून अपहरण करून आरोपीने धाराशिव गाठत तिचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.
पुणे कनेक्शन आणि ‘मिसिंग’ तक्रार
या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. संबंधित मयत महिलेबाबत १९ नोव्हेंबर रोजी पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात बेपत्ता (मिसिंग) असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ही महिला आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली असता, आरोपीने तिथूनच तिचे अपहरण केले होते.
सीसीटीव्हीमुळे आरोपी गजाआड
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनिकेत महादेव कांबळे (, जि. लातूर) याला वाकड पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी अनिकेत हा वॅगनआर (WagonR) गाडीतून महिलेला घेऊन गेल्याचे दिसून आले. त्याआधारे पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशीदरम्यान त्याने या भयानक कृत्याची कबुली दिली आहे.
नेमके काय घडले?
आरोपी अनिकेत कांबळे आणि मयत महिला राणी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. १९ नोव्हेंबर रोजी आरोपीने महिलेला गाडीतून पळवून आणले. त्यानंतर, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी हद्दीत निर्जन स्थळी आणून तिचा निर्घृण खून केला. आपली ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा, यासाठी आरोपीने मृतदेहावर पेट्रोल ओतून तो जाळला आणि तिथून पसार झाला.
नातेवाईक ढोकीत दाखल
महिलेची ओळख पटल्यानंतर तिचे नातेवाईक आज ढोकी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. ढोकी पोलीस आणि पुणे पोलीस यांच्या समन्वयाने पुढील तपास सुरू आहे.
पार्श्वभूमी (घटनाक्रम):


२७ नोव्हेंबर रोजी सकाळी रुई (ढोकी) रेल्वे फाटकाजवळ, अंकुश बोडके यांच्या शेतालगत एका १८ ते २३ वयोगटातील तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. तिचा चेहरा आणि शरीर ओळखू न येण्याइतपत जाळण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस पाटील राहुल वाकुरे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला पोलिसांसमोर या मृतदेहाची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते, मात्र वाकड पोलिसांच्या तपासाने या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.






