ढोकी – ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी पारधी पिडी आणि गोवर्धनवाडी परिसरात दिनांक ७ मे २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या तुफान दगडफेक आणि मारहाणीच्या घटनांनी प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी ढोकी पोलिसांनी दोन्ही गटांतील अनेक व्यक्तींविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
घटनेची सविस्तर माहिती अशी की:
पहिला प्रकार (पोलीस फिर्यादी):
दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता, जयभवानी पारधी पिडी येथील गट नंबर २ मध्ये दोन गट आमनेसामने आले. एका गटातील सुनिल देवराव पवार, लहु बारीकराव पवार, बापु देवराव पवार यांच्यासह सुमारे ३५ जणांनी आणि दुसऱ्या गटातील बिभीषण नाना काळे, विनोद नाना काळे, मुना नाना काळे यांच्यासह सुमारे ३० जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले, लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तसेच काही मोटरसायकलींची तोडफोड करून नुकसानही करण्यात आले. याप्रकरणी पोलीस शिपाई राजाभाऊ गैबीनाथ सातपुते (वय ५३ वर्षे) यांनी दिनांक ८ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११०, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरा प्रकार (नागरिकाची फिर्याद):
तत्पूर्वी, त्याच दिवशी म्हणजे ७ मे २०२५ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता गोवर्धनवाडी येथे, नाना छम्या काळे (वय ४७ वर्षे, रा. जयभवानी नगर पारधी पिडी, ढोकी) यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली. फिर्यादीनुसार, लहू बारीकराव पवार, बापू देवराव पवार, दत्ता सोमनाथ पवार यांच्यासह सुमारे ३५ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून दगडफेक करत मारहाण केली. याप्रकरणी नाना काळे यांनी ८ मे २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १८९(३), १९०, ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३), १२५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या दोन्ही घटनांमुळे ढोकी परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मोठ्या संख्येने आरोपी दोन्ही गटात असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.