ढोकी – धाराशिव तालुक्यातील तेर शिवारातील शेत गट क्रमांक ५८१ मधील तेरणा तलावावरून अज्ञात चोरट्यांनी पानबुडी मोटार व केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल व्यंकट थोडसरे (वय ३८, रा. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ ते १४.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील ९,००० रुपये किमतीची पानबुडी मोटार व केबल चोरून नेली. त्याचबरोबर बाळासाहेब पार्श्वनाथ बुबणे यांच्या शेतातील १०,००० रुपये किमतीचा मोटारीचा केबल आणि रामचंद्र आबा नाईकवाडी यांच्या शेतातील ३४,००० रुपये किमतीची ५ एचपी पानबुडी व केबल असा एकूण ५३,००० रुपये किमतीचा माल चोरून नेण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद अमोल थोडसरे यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७९(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शेळी चोरी प्रकरणी नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल
नळदुर्ग: किलज येथील शिवाजी विश्वनाथ सांगवे (वय ६२) यांच्या घरासमोरून १०,००० रुपये किमतीची शेळी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी २०२५ रोजी रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शिवाजी सांगवे यांच्या राहत्या घरासमोरून किशोर बापू मोटे (वय ३२, रा. विश्रांतवाडी, धानुरी रोड, पुणे १५) आणि एका अनोळखी इसमाने त्यांची शेळी चोरून नेली.
याप्रकरणी सांगवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.