धाराशिव: दिनांक १८ जून २०२५ रोजी, धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत एकूण २० जर्शी गायी आणि २६ लहान वासरे जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी २६,८३,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, वैराग रोडवरील इंडिया विटभट्टीजवळ सापळा रचण्यात आला. दुपारी १:०० च्या सुमारास वैरागमार्गे येणारा एक आयशर टेम्पो (क्र. एम एच ४५ ०९२७) थांबवून तपासणी केली असता, त्यात १४ काळ्या-पांढऱ्या रंगाच्या जर्शी गायी आढळून आल्या. टेम्पोचालक, इरशाद कमाल नदाफ (वय ३१, रा. जुना बाजार तळ, अकलूज), याला ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर काही वेळातच पाठीमागून येणारा दुसरा निळ्या रंगाचा आयशर टेम्पो (क्र. एम एच १२ ए आर ९४२५) पोलिसांनी थांबवला. या टेम्पोमध्ये २६ लहान वासरे आणि ६ जर्शी गायी निर्दयपणे भरलेल्या आढळल्या. या टेम्पोचा चालक, रामपाल दत्तात्रय खंडागळे (वय ३८, रा. यशवंत नगर, अकलूज), यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
चालकांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी ही सर्व गुरे माळशिरस आणि नातेपुते परिसरातून धाराशिव येथील बाबा गौस इरशाद कुरेशी यांच्यासाठी खरेदी केली असल्याचे सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी दोन्ही टेम्पो, २० जर्शी गायी आणि २६ वासरे असा एकूण २६,८३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ अंतर्गत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शाफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या संयुक्त कारवाईत धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील एस. शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकांचा समावेश होता.
व्हिडीओ बघा