धाराशिव: लातूर- मुंबई आणि नांदेड- पनवेल रेल्वे गाडयांना कळंब रोड येथे थांबा देण्याची तसेच सोलापूर- तुळजापुर- धाराशिव रेल्वे मार्गासाठी 80 टक्के भूसंपादन पूर्ण केल्याशिवाय निविदा काढू नये, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेंनिंबाळकर यांनी लोकसभेत केली आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला शेतकऱ्यांना आकांक्षीत जिल्हा म्हणून थेट खरेदी प्रस्तावाप्रमाणे द्यावा. तसेच, 80 टक्के भूसंपादन पूर्ण न होता रेल्वे मार्गाचे टेंडर काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.
राजेंनिंबाळकर यांनी यावेळी लातूर- मुंबई, बिदर- मुंबई रेल्वे गाडयांना अतिरिक्त जनरल डब्बे जोडण्याची मागणी केली आहे, कारण या गाडयांमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असून जनरल डब्बे ओव्हरक्राऊड होतात. त्यामुळे धाराशिव आणि बार्शी स्थानकावरून जनरल बोगीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही.
शेतकऱ्यांच्या जमिनींवरील रेल्वे विभागाच्या अतिक्रमणाची समस्याही खासदारांनी मांडली. त्यांनी रेल्वे विभागाने शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीमध्ये त्यांची सीमा निश्चित करावी आणि अतिक्रमण टाळावे, अशी मागणी केली.
लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनाच्या बाबतीतही त्यांनी सरकारवर टीका केली, कारण अनेक वर्षांपासून उद्घाटन होऊनही उत्पादन सुरू झालेले नाही. धाराशिव रेल्वे स्थानकावरील रॅक पॉइंटवर निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात खते आणि अन्नधान्याची नासाडी होत असल्याकडेही त्यांनी रेल्वे मंत्री यांचे लक्ष वेधले आहे.