धाराशिव: धाराशिवचे माजी जिल्हाधिकारी आणि नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नावाचा गैरवापर करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या आशिष विसाळच्या फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता स्वतः डॉ. गेडाम यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
‘हा भामटा माझ्या नावाचा गैरवापर करतोय, आधीच माहिती होती’ – डॉ. गेडाम
डॉ. प्रवीण गेडाम यांनी धाराशिव लाइव्हला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं, “तुमच्याशिवाय आणखी दोन व्यक्तींनी मला याची माहिती दिली होती. सतर्क केल्याबद्दल धन्यवाद.” यावरून हे स्पष्ट होतं की, विसाळच्या ‘गैरव्यवहाराची चर्चा’ अनेक ठिकाणी सुरू होती.
गंभीर आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू!
सरकारी अधिकाऱ्यांना आमदार सुरेश धस यांचे नाव सांगून धमकावत खंडणी वसूल करणाऱ्या विसाळने १८ लाखांची गाडी घेतली असून, त्याच्या एका खासगी बँकेत तब्बल २ कोटींची ठेव आहे! यामुळे आता पोलिसांनी त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.
धस यांचा इशारा – ‘६ तारखेला बघतोच!’
दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी यावर तडाखेबंद प्रतिक्रिया देत “त्याला सोडू नका, चौकशी करा! ६ फेब्रुवारीला आष्टीला घेऊन या, मी त्याला कसा तुडवतो ते बघा!” असे आदेश दिले आहेत.
विसाळचा ‘फसवणूक सिनेमा’ संपलाय!
आता पोलिस तपासाअंती विसाळचे आणखी कोणते कारनामे बाहेर पडतात, त्याच्या ‘अर्थसंपन्न’ घडामोडींचा आणखी कोणावर परिणाम झालाय, हे लवकरच स्पष्ट होईल.