धाराशिव … ‘जिल्ह्याचे ठिकाण’ असणे, हेच मुळात येथील नागरिकांसाठी एक शाप ठरल्यासारखी परिस्थिती आहे. गेली १८ महिने शहरातील नागरिक ज्या खड्डेमय आणि धुळीने माखलेल्या रस्त्यांमुळे नरकयातना भोगत आहेत, त्या रस्त्यांचा ‘उद्धार’ करण्यासाठी आलेला १४० कोटींचा निधी, हा ‘विकास’ करण्यासाठी नसून, दोन सत्ताधारी नेत्यांना एकमेकांवर ‘राजकीय सूड’ उगवण्यासाठीच मंजूर झाला होता की काय, अशी शंका घेण्यासारखी आजची परिस्थिती आहे. भाजप आमदार राणा पाटील आणि शिंदे गटाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील ‘अहंकाराची’ लढाई इतक्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे की, खुद्द शासनानेच या कामाला ‘स्थगिती’ देऊन, धाराशिवकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
हा निव्वळ प्रशासकीय विलंब नाही, हा सत्तेचा नंगानाच आहे. हा ‘खेळखंडोबा’ समजून घेणे गरजेचे आहे. आधी आमदार राणा पाटील यांनी, जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) २६८ कोटींच्या निधीला ‘स्थगिती’ आणून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना शह दिला, कारण त्यात (कथितपणे) पालकमंत्र्यांच्या मर्जीतील कामांचा वाटा मोठा होता. त्यानंतर, ‘हिशोब बरोबर’ करण्यासाठी, पालकमंत्र्यांनी आमदार पाटील यांच्या मर्जीतील कंत्राटदाराला मिळणाऱ्या १४० कोटींच्या रस्ते कामावरच ‘वार’ केला. या ‘जिरवाजिरवी’च्या राजकारणात, दोन्ही नेत्यांनी जिल्ह्याचा विकासच वेठीस धरला आहे.
याहून मोठा विनोद म्हणजे, याच १४० कोटींच्या कामाचे ‘कार्यारंभ आदेश’ मिळाल्याचे सांगत, ‘६० कोटी वाचवले’ म्हणून आमदारांनी शहरात मोठमोठे होर्डिंग्ज लावले, कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारले आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाच्या तारखाही (मनानेच) जाहीर केल्या. हा सगळा ‘तमाशा’ सुरू असतानाच, नगर विकास विभागाने ‘तक्रारीची चौकशी’ करण्याचे कारण देत या कामाला स्थगिती दिली. हा धाराशिवकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. ‘महायुती’ म्हणून सत्तेत एकत्र बसणाऱ्या याच दोन पक्षांचे नेते एकमेकांचे पाय खेचण्यात इतके मग्न आहेत की, त्यांना जनतेच्या हाल-अपेष्टांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही.
आता हा वाद इतका विकोपाला गेला आहे की, तो ‘विकासा’कडून ‘लायकी’वर आला आहे. आमदारांचे समर्थक पालकमंत्र्यांना ‘शुक्राचार्य’ म्हणत आहेत, तर आमदार स्वतः फेसबुक पोस्ट करून ‘राजकीय अप्रवृत्तीं’वर टीका करत आहेत. या वादात ठाकरे सेनेनेही उडी घेत, “स्थगिती तुमचेच सरकार देते, अन् दोष आमच्यावर? हा तर ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत,” असा घणाघात केला आहे. “‘टक्केवारी’साठी लाडक्या कंत्राटदाराला काम दिले, म्हणूनच तुमच्याच फडणवीस सरकारने स्थगिती दिली,” असा गंभीर आरोपही होत आहे.
शहरात “#हीच_तुझी_लायकी” अशा हॅशटॅगखाली ‘भीक मागितली’ विरुद्ध ‘टक्केवारी’ असे होर्डिंग्ज आणि पोस्टर लावून, हे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांची ‘लायकी’ काढत आहेत. पण खरा प्रश्न हा आहे की, ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले, त्या जनतेची ‘लायकी’ तुम्ही काय ठेवली आहे?
सत्य हेच आहे की, हा वाद ‘विकासा’चा नसून ‘स्वार्थाचा’ आहे. हा वाद ‘तत्त्वांचा’ नसून ‘टक्क्यांचा’ (टक्केवारी) असल्याची शंका आता उघडपणे व्यक्त होत आहे. ‘दादा’ विरुद्ध ‘पालक-भाऊ’ यांच्या या वैयक्तिक लढाईत, धाराशिवच्या विकासाचा बळी जात आहे. नेते होर्डिंगबाजी आणि सत्काराच्या ‘इव्हेंटबाजी’त मश्गूल आहेत आणि जनता धुळीच्या ‘गॅस चेंबर’मध्ये श्वास घेत आहे. हा धाराशिवकरांनी केलेला अक्षम्य विश्वासघात आहे.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह





