धाराशिव जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्थेवर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे – शिक्षण क्षेत्र एका अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे रसातळाला जात आहे का? शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या कारभारावर शिक्षक संघटनांनी गंभीर आरोप लावले आहेत. या आरोपांमध्ये लाचखोरी, बनावट विद्यार्थी संख्येवर आधारित शाळा सुरू ठेवणे, पोषण आहार योजनेतील गैरव्यवहार आणि अनधिकृत भरतीसारख्या बाबींचा समावेश आहे. पण, या आरोपांमध्ये किती तथ्य आहे आणि हा खेळ कुठपर्यंत जाणार आहे?
शिक्षक बदलीचा बाजार – ‘नोटा द्या, शाळा घ्या’!
धाराशिव जिल्ह्यातील शिक्षण विभागात बदली म्हणजे सोपा विषय नाही. शिक्षकाची बदली होण्यासाठी किती पैसा मोजावा लागतो? कोणी किती ‘दर’ ठरवतो? आणि सगळ्यांत महत्त्वाचं – जर पैसा नसेल तर काय करायचं? समता विद्यालय, सापनाई येथील शिक्षकाने आत्मदहनाचा इशारा दिला, तेव्हा त्याची बदली मंजूर झाली! याचा अर्थ काय? जर तुम्ही ‘भारी नाटक’ केलंत, तरच प्रशासन तुमच्या मागे धावेल, नाहीतर तुमचा फक्त छळच होईल.
विद्यार्थी कमी, संख्येचा खेळ मोठा!
शिक्षण क्षेत्रातील सर्वांत मोठी गुपितं कधी उघडकीस येतात? जेव्हा आकड्यांचा गोंधळ सुरू होतो. धाराशिव जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये बनावट विद्यार्थी दाखवले जातात, फक्त अनुदान टिकवण्यासाठी! हा शिक्षणाचा विकास आहे की फक्त आर्थिक स्वार्थ? शिक्षक नसले तरी वेतन सुरू, विद्यार्थी नसले तरी वर्ग चालू, मुख्याध्यापक नसले तरी पदं भरलेली! हे नक्की शिक्षण आहे की पैशांचा खेळ?
शिक्षण क्षेत्र की लिलावाचा मंच?
शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू असल्याची ओरड शिक्षक संघटनांकडून होत आहे. जर शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीनेच शिक्षणाला बाजाराच्या तत्त्वावर चालवायला सुरुवात केली, तर भविष्य काय? विद्यार्थ्यांना शाळेत आणायचं, पण शिक्षण नाही, फक्त आकडे भरण्याचा खेळ! हजेरीपत्रिका आहे, पण विद्यार्थी नाही. वेतन आहे, पण काम करणारे नाहीत. मग शिक्षणाची ही सगळी नाट्यमंडळी सुरू ठेवणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांचा उद्धार कसा करायचा?
‘प्रभारी’ नव्हे, ‘प्रभुत्व गाजवणारे’ मुख्याध्यापक!
धाराशिव जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापक नाहीत, फक्त ‘प्रभारी’ आहेत. पण हे प्रभारी नक्की कोण आणि त्यांची निवड कशी होते? इथेही लाचखोरीचा अजेंडा दिसतो. जर तुम्ही योग्य व्यक्ती नसाल, पण योग्य किंमत देऊ शकत असाल, तर तुम्हाला ‘मुख्य’ करता येतं. यात शिक्षणाचा काही संबंध आहे का?
हे फक्त सुधा साळुंके यांचं प्रकरण नाही!
हो, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्यावर आरोप झाले आहेत, आणि चौकशी व्हायलाच हवी. पण ही संपूर्ण व्यवस्था एका व्यक्तीने बिघडवली का? हा एकट्या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार आहे, की संपूर्ण यंत्रणाच या खेळात सामील आहे? शिक्षणाच्या मंदिरात देवी-देवतांऐवजी दलाल बसले असतील, तर हे मंदिर कोणत्या दिशेने चाललंय, याचा विचार झाला पाहिजे.
नार्को टेस्ट, चौकशी आणि शिक्षण क्षेत्राचा स्वच्छ नवा अध्याय!
शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, आणि ती निःपक्षपाती असली पाहिजे. सुधा साळुंके यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे – यातून काय बाहेर येईल? ही एकच व्यक्ती दोषी ठरणार की संपूर्ण शिक्षण यंत्रणेचा भ्रष्ट चेहरा समोर येणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
पालक आणि विद्यार्थ्यांना काय मिळणार?
या सगळ्या प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? फक्त सरकारी फाइलांमधील फेरफार नाही, तर शिक्षणाचा स्तरच गडगडत चालला आहे. शिक्षक बदल्यांचा खेळ, विद्यार्थी संख्येचा बनाव, भ्रष्टाचाराने ग्रासलेले पोषण आहार, आणि पैशांसाठी विकले जाणारे मुख्याध्यापक – हे सगळं सुरूच राहणार का? की आता काहीतरी बदल होणार आहे?
धाराशिव जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेचा हा गंभीर प्रश्न आहे. प्रश्न सुधा साळुंके यांचा नाही, प्रश्न संपूर्ण सिस्टिमचा आहे. ही सिस्टिम साफ करायची असेल, तर केवळ एका अधिकाऱ्याच्या चौकशीने काही होणार नाही. संपूर्ण व्यवस्थेवरच ‘नार्को टेस्ट’ करायची गरज आहे! नाहीतर, काही वर्षांनी आपण फक्त एक आठवण ठेवू – एके काळी शिक्षण ही प्रतिष्ठेची गोष्ट होती!
- बोरूबहाद्दर