उमरगा: राष्ट्रीय महामार्गावर शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर कॉर्नरजवळ शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या आयशर टेम्पोने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शिवाप्पा सातप्पा मगे (वय ३८) आणि अनिता देवेंद्र माळी (वय ४८, रा. हिप्परगाराव) यांचा समावेश आहे. अपघातानंतर टेम्पोचालकाने दुचाकीला सुमारे पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोळसूर (गुंजोटी) येथील रहिवासी असलेले शिवाप्पा सातप्पा मगे हे त्यांची बहीण अनिता देवेंद्र माळी यांना मुंबईला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसवण्यासाठी कोळसूर येथून दुचाकीवरून उमरगा बसस्थानकात आले होते. मात्र, मुंबईला जाणारी एसटी बस उपलब्ध नसल्याने दोघेही बहिण-भाऊ दुचाकीवरून कोळसूरला परत निघाले होते.
शहराच्या बाह्यवळण रस्त्याकडे जात असताना, हैदराबादच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पो (क्र. एमएच 13 सी यु 1686) ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शिवाप्पा आणि अनिता या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतरही टेम्पोचालकाने न थांबता दुचाकीला फरफटत सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील तुरोरी गावापर्यंत नेले.
दरम्यान, तुरोरी गावातील सजग ग्रामस्थांनी हा प्रकार पाहून आयशर टेम्पोला अडवले आणि चालकाला पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी उमरगा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.