तुळजापूर मतदारसंघात आज विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील मतदानाचा उत्साहही लक्षणीय ठरला असून जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद तुळजापूर मतदार संघात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२. २६ टक्के मतदान झाले. दरम्यान, वडगाव लाख येथील एका मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडल्याची एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली, ज्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीनुसार, वडगाव लाख येथील एका मतदान केंद्रावर एका वृद्ध मतदारास मतदान अधिकाऱ्याने “पहिले बटन सोडून कोणतेही बटन दाबा” असे सांगितल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाने काही प्रमाणात चर्चेला उधाण आले आणि मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली तातडीने दखल
या अफवेमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत संशय निर्माण होऊ नये यासाठी वरिष्ठ मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. संबंधित मतदान केंद्राची पाहणी करून सविस्तर चौकशी करण्यात आली. या चौकशीत व्हायरल झालेल्या बातमीमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचे उघड झाले. प्रशासनाने स्पष्ट केले की, मतदान प्रक्रिया सुरळीत आणि नियमांनुसार पार पडली असून अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण घडलेले नाही.
प्रशासनाचे आवाहन
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना प्रशासनाने मतदारांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. “मतदान प्रक्रियेबाबत कोणतीही चुकीची माहिती पसरविणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा आणि शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण करा,” असे प्रशासनाने स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील खोडसाळपणाविरोधात कारवाईचा इशारा
प्रशासनाने असे प्रकार निवडणूक प्रक्रियेस बाधा आणू शकतात, असे नमूद करत खोडसाळपणे चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अशा बातम्यांमुळे गोंधळ निर्माण होतो आणि मतदारांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य माहितीची खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने पुन्हा एकदा सांगितले आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत
तुळजापूर मतदारसंघासह धाराशिव जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावल्याने जिल्ह्यातील एकूण मतदानाची टक्केवारी लक्षणीय ठरली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, हे निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वीतेचे मोठे उदाहरण मानले जात आहे.