बेंबळी – तालुक्यातील पाडोळी शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभा शिवाजी सूर्यवंशी (वय ६२ वर्षे, रा. एंकबी, ता. औसा, जि. लातूर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक ४ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाडोळी शिवारातील शेतात ही घटना घडली. शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून आरोपी दिलीप प्रेमराज गुंड आणि महानंदा दिलीप गुंड (दोघे रा. पाडोळी, ता. जि. धाराशिव) यांनी शोभा सूर्यवंशी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली आणि त्यांना जखमी केले.
या घटनेप्रकरणी शोभा सूर्यवंशी यांनी ९ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून बेंबळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.