धाराशिव – “निवडणुकीच्या वेळी सरकारने ‘लाडकी बहीण’, ‘लाडका शेतकरी’, ‘लाडका भाऊ’ यांसारख्या संकल्पना रेटून मते मागितली. मात्र, प्रत्यक्ष आर्थिक तरतुदीच्या वेळी हे घटक पूर्णपणे गायब झाले,” अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारने निवडणुकीच्या प्रचारात मोठमोठ्या घोषणा केल्या, मात्र त्या प्रत्यक्षात न आल्यामुळे नागरिकांची घोर फसवणूक झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणणारे आता याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. युवकांसाठी कोणत्याही योजना जाहीर झालेल्या नाहीत,” असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची घोर फसवणूक
निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी हमीभावासह भावांतर योजनेचा लाभ देण्याची घोषणा झाली होती. तसेच, शेतीसाठी आवश्यक निविष्टा खरेदी करताना जीएसटी सवलत देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अर्थसंकल्पात याचा कोणताही उल्लेख नसल्याने सरकारची असंवेदनशीलता स्पष्ट झाली आहे, अशी टीका आमदार पाटील यांनी केली.
मराठवाड्यासाठी तरतुदीचा अभाव
धाराशिव जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावांना अर्थसंकल्पात स्थान न मिळाल्याने मोठी निराशा झाली आहे. विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्पासाठी दीड हजार कोटींची तरतूद करण्यात आली, परंतु मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी अपेक्षित निधी मिळाला नाही, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.
“सरकार फक्त घोषणाबाजी करून निवडणुका जिंकण्याचा खेळ खेळत आहे. प्रत्यक्षात मात्र ना शेतकऱ्यांसाठी मदत, ना महिलांसाठी योजना, ना युवकांसाठी संधी! हे सरकार जनतेची फसवणूक करणारे आहे,” अशी तीव्र टीका आमदार कैलास पाटील यांनी केली.