अणदूर (ता. तुळजापूर) – श्री खंडोबाच्या पवित्र नगरीत विकासाच्या नावाखाली रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू होणार असले, तरी प्रत्यक्षात हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. १ कोटी ३६ लाख रुपये खर्च करून ४०० मीटरचा रस्ता तयार होणार असला, तरी अतिक्रमण हटवण्याचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरळ डोळेझाक केली जात आहे.
अतिक्रमण हटवायचेच नाही?
बसस्थानक ते आण्णा चौक या मार्गावर दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. काहींनी तर सरकारी रुग्णालयासमोर पक्के बांधकाम करून सार्वजनिक रस्त्यालाच ग्रासले आहे. पत्र्याचे शेड टाकून अडथळा निर्माण करणाऱ्यांना ग्रामपंचायतीने रोखण्याचे धाडस दाखवलेले नाही. अतिक्रमण कायम ठेवूनच काँक्रीटचा रस्ता तयार केला जात आहे, म्हणजे भविष्यात हा प्रश्न आणखीनच गंभीर होणार!
नाल्या नाहीत, पाणी कुठे जाणार?
सर्वसामान्य नियम असा की, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे केली जातात. मात्र, अणदूरमध्ये हा मुद्दा सर्रास डावलला जात आहे. पावसाळ्यात पाणी निघणार कुठे? साचलेले पाणी रस्त्यावरच राहिल, आणि दोनच वर्षांत नवा रस्ता उखडण्याचा धोका निर्माण होईल.
“निकृष्ट कामासाठी प्रसिद्ध असलेला गुत्तेदार”
या कामाचा ठेका भाजपशी संबंधित एका गुत्तेदाराने घेतला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, हा ठेकेदार निकृष्ट काम करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या हातून झालेले अनेक प्रकल्प गुणवत्तेच्या अभावामुळे वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे अणदूरचाही रस्ता हा एक मोठा भ्रष्टाचाराचा नमुना ठरणार का, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
राजकारण आणि विकास – दोन्हीचा खेळखंडोबा!
अणदूर हे मोठे तीर्थक्षेत्र असून, महाराष्ट्र-कर्नाटकातून लाखो भाविक येथे येतात. विकासाची गंगा वाहायला हवी, मात्र ती राजकीय हस्तक्षेपाने गढूळ होत आहे. अतिक्रमण काढण्याऐवजी त्यावरच रस्ता टाकला जाणार, नाल्या करायच्या नाहीत, आणि वर निकृष्ट काम होणार! हे सगळे नंतर कोण भोगणार? अर्थातच स्थानिक नागरिक आणि दर्शनाला येणारे भाविक!
ग्रामस्थांनी या प्रकल्पावर लक्ष ठेवावे आणि दर्जेदार कामासाठी प्रशासनावर दबाव टाकावा, अशी स्थानिक स्तरावर जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, हा रस्ता झाल्यावरही “संपला तरी सुरूच!” अशी अवस्था होईल!