धाराशिव – तालुक्यातील दाऊतपूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामादरम्यान विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून वापरल्याप्रकरणी मे. एस. जे. कन्स्ट्रक्शन यांना 38.84 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम अद्याप भरली नसल्याने कंत्राटदाराच्या मालमत्तेवर म्हणजे सात बारा उतारावर अखेर बोजा चढवण्यात आला आहे.
सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी 29 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. तत्कालीन उपविभागीय अधिकारी, धाराशिव योगेश खरमाटे यांच्याकडे या तक्रारीची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, कंत्राटदाराने विनापरवाना गौण खनिज उत्खनन केल्याचे सिद्ध झाले.
दंडाची रक्कम कंत्राटदाराने भरली नसल्याने तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी वसुलीची कार्यवाही केली आहे. रुईभर येथील मे. एस. जे. कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रा.- शैलजा जयप्रकाश कोळगे या आहेत.त्यांच्या सात बारा उतारावर हा बोजा चढवण्यात आला आहे.
हे संपूर्ण प्रकरण सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या माध्यमातून धाराशिव लाइव्हने उघडकीस आणले होते.