धाराशिव – धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कुलमध्ये सुरू असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेदरम्यान त्या विषयाच्या शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.
या संदर्भात गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांचे चौकशी पथक आज शाळेत पोहोचले. अधिकाऱ्यांच्या अचानक झालेल्या भेटीमुळे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मोठी धांदल उडाली. शाळेचा निकाल चांगला लागावा म्हणून विषय शिक्षक विद्यार्थ्यांना तोंडी उत्तरे सुचवत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संघटनेच्या तक्रारीनुसार, परीक्षा केंद्रावर मराठी विषयाच्या पेपरसाठी मराठी शिक्षक पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते, जे परीक्षा मंडळाच्या नियमानुसार अयोग्य आहे. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी चौकशी पथकाने प्राथमिक तपासणी सुरू केली असून, दोषी आढळल्यास शाळेवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या चौकशीमुळे जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही खळबळ उडाली आहे.
(या प्रकरणाचा पुढील तपशील लवकरच…)