धाराशिव येथील दिपक पंडू सपकाळ यांना राजकुमार भोसले आणि रविना राजकुमार भोसले यांनी लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9.30 वाजता देवळाली येथे ही घटना घडली. आरोपींनी दिपक सपकाळ यांना लैंगिक अत्याचाराच्या खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली आणि या प्रकरणातून वाचण्यासाठी पाच लाख रुपये मागितले.
या घटनेनंतर दिपक सपकाळ यांनी 12 सप्टेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम 384, 34 अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.