मुरुम येथे इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट टाकण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महंमद बागवान आणि शुभम नागुरे यांनी 7 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय रेस्ट हाऊससमोरील कट्ट्यावर अमित राजू काळे (वय 16) याला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी अमितला लाथाबुक्यांनी, हंटर आणि बेल्टने मारहाण करून गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर त्यांनी अमितला जीवे मारण्याची धमकीही दिली.
अमित काळे यांनी 12 सप्टेंबर 2024 रोजी मुरुम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3) सह अ.जा.ज.अ.प्र. अधिनियम कलम 3(2)(va), 3(1) (R) 3(1) (S) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.