धाराशिव – छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून डॉल्बी वाजवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. आरोपींनी केवळ पोलिसांवर हातच उगारला नाही, तर शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांच्या ताब्यातून डॉल्बीचा ट्रेलर आणि ट्रॅक्टरही पळवून नेला. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराज जयंतीची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत ‘ॲक्रॉस प्रो साऊंड’चा डॉल्बी लावण्यात आला होता. डॉल्बीचा आवाज क्षमतेपेक्षा जास्त असल्याने आणि त्यामुळे ध्वनी व पर्यावरण प्रदूषण होत असल्याने, बंदोबस्तावर असलेले धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार जयप्रकाश प्रभाकर गलांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉल्बी मालक अजित वानकर आणि आयोजकांना आवाजाची तीव्रता कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी पोलिसांच्या या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केले.
या नियमांचे उल्लंघन झाल्याने कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस डॉल्बीचा ट्रेलर (क्र. एमएच ४६ डीसी २८१८) आणि विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. त्याच वेळी आरोपी आकाश राम माळी, रोहन अजित वानकर (वय २३, रा. स्वारगेट, पुणे), सौरभ निंबाळकर आणि शेरकर (सर्व रा. धाराशिव) यांनी तिथे येऊन फिर्यादी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्टाफला मारहाण केली. आरोपींनी शासकीय कामात थेट अडथळा निर्माण करत ट्रेलर आणि ट्रॅक्टर चालकाला वाहनांसह तिथून पळवून लावले.
या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस कर्मचारी जयप्रकाश गलांडे यांनी १५ मे रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२३, २८९, २९२, २९३, १८९(२), ११५(२), १९०, १९१ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३, १५ आणि ध्वनी प्रदूषण नियम २००० च्या कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांवरच झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी वाजवणे भोवले; मिरवणुकीतील दोघांवर गुन्हे दाखल
धाराशिव : छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीमध्ये पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून मर्यादेपेक्षा जास्त आणि कर्णकर्कश आवाजात डॉल्बी सिस्टीम वाजवणाऱ्या दोघांवर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांना नाहक त्रास होईल अशा पद्धतीने डीजे वाजवल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, १४ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ (२०:२६) वाजेच्या सुमारास शहरातील छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणुकीत हा प्रकार उघडकीस आला. मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा किंवा पोलिसांनी दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, मालक आणि आयोजकांनी या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यांनी एका वाहनावर (टॉप व बस) डॉल्बी डीजे साऊंड सिस्टीम लावून त्याचा आवाज ठरवून दिलेल्या ध्वनी तीव्रतेपेक्षा खूप जास्त आणि कर्णकर्कश ठेवला होता.
याप्रकरणी पोलिसांनी राहुल अर्जुन रॉय (वय ३६ वर्षे, रा. भवानी पेठ ४२, पुणे) आणि सागर विठ्ठल पवार (रा. उंबरे कोठा, ता. जि. धाराशिव) यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २८९, २७०, २९३ सह कलम ३(५), तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ व १५ आणि ध्वनी प्रदूषण नियम २००० च्या कलम ३, ४, ५ व ६ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





