धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात तसे अनेक तारे-तारका होऊन गेले, पण फेसबुक पिंट्यांसारखा ‘धूमकेतू’ आजवर झाला नव्हता. पिंट्या हे नाव त्यांच्या आई-वडिलांनी ठेवले होते, पण ‘फेसबुक’ ही पदवी त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने, म्हणजे रोजच्या फोटो आणि पोष्ट टाकण्याच्या अविश्रांत मेहनतीने मिळवली होती. ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ हे त्यांचं साधं-सोपं ब्रीदवाक्य होतं, जे त्यांनी आपल्या कार्यालयाच्या भिंतीवर सोन्याच्या अक्षरात (अर्थात, बनावट सोन्याच्या) लिहून ठेवलं होतं.
पिंट्यांचा कार्यकर्ता वर्ग म्हणजे एक बहुरंगी पुष्पगुच्छ होता. त्यात पिटू नावाचा ड्रग्ज माफिया, जो स्वतःला ‘केमिकल इंजिनिअर’ म्हणवून घ्यायचा; मटका किंग मन्या, जो आकड्यांच्या दुनियेचा ‘अर्थतज्ञ’ होता; आणि चार-दोन गुंड, जे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून काम पाहायचे. बाकीचे कार्यकर्ते हुजरेगिरी करण्याच्या स्पर्धेत कायम आघाडीवर असायचे.
पिंट्यांचा दिवस सकाळी उठून फेसबुकवर ‘Good Morning #VikasPurush’ अशी पोस्ट टाकण्याने सुरू व्हायचा. त्यानंतर ते आपल्या चमच्यांना बोलवून दिवसभरासाठी ‘प्रेस नोट’ तयार करायला सांगायचे. “आज लिहा, ‘पिंट्यांच्या एका डोळ्याच्या इशाऱ्यावर ढगांनी पाणी सोडले, शेतकरी सुखावला’,” किंवा “पिंट्यांनी केलेल्या वृक्षारोपणामुळे ऑक्सिजन पातळीत १६००% वाढ, नासाने घेतली दखल,” अशा बातम्या रोजच्या रोज प्रसिद्ध व्हायच्या.
मागच्या वर्षी पिंट्यांनी ५ हजारांचा निधी (चुकून प्रेस नोटमध्ये ५ कोटी छापून आले होते) आणल्याबद्दल स्वतःचा भव्य सत्कार करून घेतला होता. त्या ५ कोटींचा हिशोब विचारल्यावर, “विकासाचा हिशोब नसतो, अनुभव असतो,” असं गूढ उत्तर देऊन त्यांनी विषय टाळला होता.
आता तर त्यांनी स्वतःलाच मागे टाकले होते. त्यांनी तब्बल १६०० कोटींचा निधी जिल्ह्यासाठी खेचून आणल्याची घोषणा केली होती. सरकारकडून अजून एक दमडीही आली नव्हती, पण ‘आणणार’ या कल्पनेनेच त्यांनी सत्काराची तयारी सुरू केली.
सत्काराच्या आयोजनाची जबाबदारी अर्थातच ‘इव्हेंट मॅनेजर’ पिटू ड्रग्ज माफिया आणि त्याच्या मित्रमंडळाने उचलली होती. पिटूने पिंट्यांना समजावले, “भाऊ, मार्केटमध्ये माहोल बनवावा लागतो. निधी आज ना उद्या येईल, पण त्याचा ‘लॉन्च इव्हेंट’ तर दणक्यात व्हायला हवा ना!”
सत्काराचा दिवस उजाडला. शहरात मोठमोठे होर्डिंग लागले होते – “धाराशिवचे भाग्यविधाते, १६०० कोटींचे जनक, फेसबुक पिंट्या!”. कार्यक्रमाच्या ठिकाणी गुंडांनी ‘शिस्तबद्ध’ गर्दी जमवली होती. मटका किंग मन्या स्टेजच्या बाजूला बसून हिशोब लावत होता की, “१६०० कोटी म्हणजे किती शून्य? आणि त्यातून आपल्याला किती मिळतील?”
पिंट्या गाडीतून उतरले आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पिटूने पुढे होऊन पिंट्यांच्या गळ्यात हाराऐवजी खोट्या नोटांची एक मोठी माळ घातली, जी त्याने खास या दिवसासाठी बनवून घेतली होती.
माईक हातात घेताच पिटू गहिवरला. “मित्रांनो, भाऊंनी १६०० कोटी आणले. हे कसे आणले, हे फक्त त्यांनाच माहीत. त्यांनी मुंबईत जाऊन पैशांच्या समुद्रात उडी मारली आणि १६०० कोटींचे मोती वेचून आणले आहेत.” उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
शेवटी पिंट्या भाषणाला उभे राहिले. “माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,” त्यांनी सुरुवात केली. “विरोधक विचारतील, पैसे कुठे आहेत? अरे, पैशांचं काय घेऊन बसलात? मी तुमच्यासाठी निधीची ‘भावना’ आणली आहे. विकास हा पैशात नाही, माणसाच्या मनात असतो. आणि मी तुमच्या मनात विकासाची ज्योत पेटवली आहे!”
एवढ्यात गर्दीतून एका धाडसी पत्रकाराने विचारले, “साहेब, ते मागच्या ५ कोटींचं काय झालं? आणि या १६०० कोटींचा जीआर (शासकीय आदेश) कुठे आहे?”
क्षणभर शांतता पसरली. पिटूने त्या पत्रकाराकडे डोळे वटारले. पण पिंट्या कसलेले राजकारणी होते. ते हसले आणि म्हणाले, “व्वा! किती छान प्रश्न विचारलात. तुमच्या या प्रश्नामुळे मला आठवलं. मी पुढच्या महिन्यात तुमच्यासाठी ३२०० कोटींचा निधी आणणार आहे आणि त्याचा ‘प्री-अप्रूव्हल’ सत्कार आपण याच्यापेक्षा मोठा करू.”
हे ऐकताच जमलेली गर्दी “पिंट्या भाऊ आगे बढो!” च्या घोषणा देऊ लागली. १६०० कोटींच्या प्रश्नावरून लक्ष आता ३२०० कोटींच्या स्वप्नाकडे गेले होते. पत्रकार बिचारा कपाळावर हात मारून बसला.
पिंट्यांनी लगेच आपला मोबाईल काढला, विजयी मुद्रेने एक सेल्फी घेतला आणि फेसबुकवर पोस्ट टाकली – “जनतेचे प्रेम आणि १६०० कोटींचा निधी… विकासाचा नवा अध्याय! #VikasPurush #DharashivKaShaan #Mission3200Crore”
…आणि सरकार अजूनही फाईलवर ‘विचारविनिमय’ करत होते.
- बोरूबहाद्दर