आधीच्या भागात आपण पाहिले: फेसबुक पिंट्याने १६०० कोटींचा (अघोषित) निधी आणल्याबद्दल स्वतःचाच सत्कार करून घेतला. आता पाहूया पुढे…
१६०० कोटींच्या निधीच्या आभासी यशानंतर फेसबुक पिंट्यांच्या डोक्यात विकासाचे वारे इतके घुसले होते की, त्यांना आता जमिनीवरचे काहीच दिसेनासे झाले होते. त्यांचा ‘विकास’ आता थेट देवाच्या घरातच हस्तक्षेप करण्यापर्यंत पोहोचला होता. “आपण श्री तुळजाभवानी मंदिराचा चेहरामोहराच बदलून टाकू,” पिंट्यांनी एका सकाळी आपल्या चमच्यांसमोर जाहीर केले. “हे जुनं शिखर, जुना गाभारा… यात ‘फिल’ नाहीये. आपण सगळं पाडून नवीन, वाय-फाय आणि सेंट्रलाइज्ड एसी असलेलं मंदिर बांधू!”
हा ‘दिव्य’ विचार त्यांच्या डोक्यात आल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात करण्यापूर्वी ‘माहोल’ बनवण्यासाठी काही खास पंडितांना बोलावून पूजा-अर्चा आयोजित केली. पूजा इतकी भव्य होती की, पिंट्यांनी स्वतः देवीच्या हातातून तलवार घेऊन हवेत अशी काही फिरवली, जणू ते ‘कटप्पा’च्या भूमिकेसाठी ऑडिशन देत होते. पूजेनंतर हार-तुरे, सेल्फी आणि फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम पार पडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात बॉम्ब पडल्यासारखी बातमी पसरली – भवानी मातेची ऐतिहासिक तलवार गायब झाली होती!
पुजारी मंडळी संतप्त झाली. “हे पिंट्यांच्या पायगुणामुळेच घडलं,” एका पुजाऱ्याने छाती पिटून सांगितले. शहरात तणाव वाढला. पुजारी मंडळाने उपोषण सुरू केले. पिंट्यांचे विरोधक सक्रिय झाले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून पिंट्यांनी तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ समितीची बैठक बोलावली, ज्यात पिटू ड्रग्ज माफिया ‘संकट व्यवस्थापन सल्लागार’ म्हणून हजर होता.
“भाऊ, टेन्शन नको,” पिटूने पिंट्यांना धीर दिला. “तलवार कुठे गेलीये?”
पिंट्यांनी हळूच सांगितले, “अरे, ती मीच बाजूच्या मठात ठेवायला लावली. आपल्या नवीन बांधकामात तिला काही धक्का नको लागायला. ‘सेफ कस्टडी’मध्ये ठेवली आहे.”
हे ऐकून पिटूने कपाळावर हात मारला. “भाऊ, तुम्ही ‘सरप्राइज’ द्यायच्या नादात सगळ्यांना ‘शॉक’ दिलाय. आता एक काम करा, तुम्हीच हिरो बना. म्हणा, ‘मी माझ्या जीवाची पर्वा न करता, चोरांचा पाठलाग करून तलवार परत आणली आहे’.”
पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पिंट्यांच्या एका अतिउत्साही चमच्याने ही गोष्ट बाहेर फोडली होती. मग काय, पिंट्यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. “तलवार चोरीला गेली नव्हतीच! आम्ही तिला ‘आध्यात्मिक ऊर्जेच्या चार्जिंगसाठी’ मठात पाठवले होते. काही लोकांना विकासाची ‘ॲलर्जी’ झाली आहे, तेच अफवा पसरवत आहेत.”
तलवारीचा वाद शमत नाही तोच, पिंट्यांनी आपला मूळ प्लॅन समोर आणला. “आपण मंदिराचे जुने शिखर पाडून तिथे सोनं आणि हिऱ्यांनी मढवलेले नवीन शिखर बांधू. गाभारा इटालियन मार्बलचा करू. यासाठी देवीची मूर्ती काही काळासाठी त्याच मठात स्थलांतरित करावी लागेल.”
ही घोषणा म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे झाले. अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ माजली. प्रकरण इतके तापले की, थेट मुंब्राहून जितोद्दिन नावाचे नेते आपल्या लवाजम्यासह तुळजापुरात दाखल झाले. त्यांनी मंदिराची पाहणी केली आणि जरबेच्या आवाजात सांगितले, “देवीच्या मंदिराचा एक दगड जरी हलला, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. लक्षात ठेवा.”
जितोद्दिन यांचा दम ऐकून पिंट्यांचा ‘विकासाचा फुगा’ टाचणी लावल्यासारखा फुटला. त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा इतका मोठा ‘यू-टर्न’ घेतला की, गुगल मॅप्सला सुद्धा लाज वाटली.
दुसऱ्याच दिवशी पिंट्यांनी पुन्हा पत्रकार परिषद बोलावली. “बंधू आणि भगिनींनो, काही दुष्ट प्रवृत्ती माझ्या नावाने मंदिराचे शिखर पाडण्याच्या अफवा पसरवत आहेत. मी तर मंदिराच्या एका विटेलाही धक्का लागू देणार नाही. उलट, ज्यांनी मंदिराच्या नावाखाली राजकारण केले, त्या बदनामी करणाऱ्यांवर मी कायदेशीर कारवाई करणार!”
आणि गंमत म्हणजे, ज्या लोकांनी या पाडकामाच्या विरोधात आवाज उठवला होता, त्यांच्याच विरुद्ध ‘मटका किंग’ मन्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रारीचे कारण होते – ‘शहरातील शांतता भंग करणे आणि विकासाला विरोध करणे.’
यालाच म्हणतात, ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे!’
पिंट्यांनी लगेच फेसबुकवर पोस्ट टाकली:
“षडयंत्राचा पर्दाफाश! आई भवानीच्या मंदिराचा खरा रक्षक मीच! बदनामी करणाऱ्यांना कायद्याचे उत्तर मिळेल. #MandirKaAsliRakshak #ZeroToleranceForRumors”
…आणि पडद्यामागे पिटू त्याला समजावत होता, “भाऊ, शिखर जाऊ दे. आपण मंदिराच्या बाहेर ‘पे अँड पार्क’चा ठेका घेऊ. त्यात जास्त ‘विकास’ आहे!”
पुढील भागात भेटूया…
- बोरूबहाद्दर