मागील भागात आपण पाहिले: मुंबईच्या ‘पवित्र’ बैठकीत मन्या मटका किंगला स्थान देऊन पिंट्याने विकासाचा नवा अध्याय लिहिला होता. आता हा विकास थेट जमिनीवर अवतरला होता…
तुळजापूरच्या बस स्थानकाचा विषय म्हणजे फेसबुक पिंट्यासाठी ‘ड्रीम प्रॉजेक्ट’ होता. गेली अनेक वर्षे पिंट्याने या प्रस्तावित बस स्थानकाचे असे काही ग्राफिक्स आणि 3D व्हिडिओ फेसबुकवर फिरवले होते की, लोकांना वाटे, हे बस स्थानक आहे की थेट दुबईच्या विमानतळाचे डिझाइन चोरले आहे! “माझ्या तुळजापूरकरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा!”, “हे केवळ बस स्थानक नाही, तर विकासाचे प्रवेशद्वार आहे!”, अशा पोस्टखाली लाईक्स आणि कमेंट्सचा पूर यायचा.
अखेर तो ‘सुवर्ण’ दिवस उजाडला. जुने बस स्थानक पाडून, आठ कोटी रुपये खर्च करून, चकचकीत नवे बस स्थानक उभे राहिले. १ मे, महाराष्ट्र दिनी, पिंट्याने ढोल-ताशे, जेसीबीमधून फुलांची उधळण आणि फेसबुक लाईव्हच्या साक्षीने या ‘विकासाच्या प्रवेशद्वाराचे’ उद्घाटन केले.
पण निसर्गाला पिंट्याचा हा ‘शो’ फार वेळ पाहवला नाही. उद्घाटन संपते न संपते तोच, अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वरुणराजाने जणू पिंट्याच्या कामावर स्वतः ‘अभिषेक’ घातला होता. आणि या पहिल्याच अभिषेकात आठ कोटींचे बस स्थानक अक्षरशः ‘चोरायला’ लागले. समोरून, मागून, छतातून, भिंतीतून… जिथे जागा मिळेल तिथून पाणी गळत होते. बघता बघता बस स्थानकाचे ‘तुळजापूर आंतरराष्ट्रीय वॉटर पार्क’ झाले.
प्रवासी बसची वाट पाहत होते की होडीची, हेच कळेनासे झाले. काहीजण आपले सामान डोक्यावर घेऊन उभे होते, तर काहीजण चपला हातात घेऊन फिरत होते. आजूबाजूला बसलेले बाजारहाटवाले शेतकरी एकमेकांना म्हणू लागले, “आरं, याच्यापरीस तर आपल्या जनावराचा गोटा बरा! निदान वरून पाणी तरी गळत नाही.”
प्रवाशांच्या शिव्यांचा गजर सुरू झाला. हा प्रकार पिंट्याच्या कानावर जाताच त्याने तातडीने कंत्राटदाराला बोलावून झापले. कंत्राटदारानेही ‘जुगाड’ करत मागच्या बाजूला काही पत्रे ठोकून ‘पॅचवर्क’ केले आणि पिंट्याने लगेच फेसबुकवर पोस्ट टाकली – “पावसामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. आपले सरकार २४ तास कार्यरत! #ActionKingPintya”
पण आभाळ फाटल्यावर ठिगळ किती लावणार? पुढच्याच पावसात ते पत्रेही गळायला लागले आणि परिस्थिती ‘जैसे थे’ झाली.
याचवेळी, एका वृद्ध, धोतरधारी आजोबांचा पारा चढला. पावसात भिजत, बसची वाट पाहून वैतागलेल्या त्या आजोबांनी थेट कॅमेऱ्यासमोर पिंट्याच्या नावाने आई-बहिणीवरून अस्सल गावरान शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. हा व्हिडिओ विरोधकांनी उचलला आणि बघता बघता #पिंट्या_शिवी_खातोय हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
आता पिंट्याची खरी पंचायत झाली. त्याने तातडीने आपली ‘डॅमेज कंट्रोल’ टीम, अर्थात पिटू ‘ड्रग्ज माफिया’ आणि मन्या ‘मटका किंग’ यांना पाचारण केले. पिटू आणि मन्याने दोन दिवसांत त्या आजोबांना हुडकून काढले.
त्यांच्या झोपडीत जाऊन पिटू म्हणाला, “आजोबा, शिव्या भारी देता की तुम्ही! एकदम व्हायरल झालाय बघा. आता तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत. एक – हीच प्रसिद्धी कायम ठेवून आमच्या ‘जनसंपर्काचा’ अनुभव घ्या. किंवा दोन – हे पाच कडकड्डकीत नोटांचे बंडल घ्या आणि आम्ही सांगतो तसा दुसरा व्हिडिओ बनवा.”
आजोबांनी शहाणपणाने दुसरा ऑप्शन निवडला.
थोड्याच वेळात एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात तेच आजोबा होते, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप होता. हातात एक पाण्याची बाटली (जी दुरून दारूसारखी दिसावी अशी ठेवली होती) धरून ते म्हणत होते, “माझं चुकलं… मी त्या दिवशी जरा जास्त ‘घेतली’ होती. नशेत मी पिंट्या भाऊंबद्दल काहीतरी बोलून गेलो. ते तर देवासारखे मानूस हायेत. माझी चूक झाली, मी माफी मागतो.”
पिंट्याने सुटकेचा निःश्वास सोडला. एका माणसाचे तोंड तर पैशाने बंद केले होते. पण रोज गळणाऱ्या बस स्थानकाचे काय? आणि दररोज तिथे उभं राहून मनातल्या मनात शिव्या देणाऱ्या हजारो प्रवाशांचे तोंड तो कसे बंद करणार होता?
आभाळ फाटलं होतं, पिंट्या ठिगळ तरी कुठे कुठे लावणार होता!
पुढील भागात भेटूया…
– बोरूबहाद्दर