तुळजापूर विकासासाठी १८६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून विकास आराखड्याला गती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंदिर परिसराच्या विकासासाठी जागतिक दर्जाच्या सुविधांची यादी मांडण्यात आली. मात्र, या गजबजलेल्या धार्मिक स्थळाला एका महत्त्वाच्या समस्येने ग्रासले आहे – ड्रग्ज आणि गुंडगिरी.
मुख्यमंत्री साहेब, विकास आराखड्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा तर केलीत, पण तुळजापूर नगरीला ड्रग्ज मुक्त करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलाल का?
तुळजाभवानी मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात, पण या पवित्र नगरीत काही अराजक प्रवृत्ती आणि ड्रग्जचा विळखा वाढतो आहे.
विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची गरज
तुळजापूर नगरीतील अवैध धंदे आणि ड्रग्जचा सुळसुळाट रोखण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणी होत आहे. या पवित्र स्थळाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी स्थानिक पोलीस व यंत्रणा पुरेशी ठरत नाही, त्यामुळे एसआयटीद्वारे ड्रग्ज तस्करांचा आणि माफियांचा छडा लावावा.
गुंडगिरीला चाप बसवा
तुळजापूर शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर उपाययोजना हवी आहे. दोषींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करून गुंडगिरीला कायमचा चाप बसवावा.
अवैध धंद्यांत सहभागी असणाऱ्यांना हद्दपार करून भाविकांना सुरक्षित आणि निर्मळ वातावरण मिळवून द्यावे.
तुळजापूरच्या प्रतिष्ठेचा सवाल
तुळजापूर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे, परंतु ड्रग्ज आणि गुंडगिरीमुळे भाविकांचा आत्मविश्वास ढळतो आहे. विकास कामांबरोबरच या धार्मिक नगरीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
फडणवीस साहेब, तुळजापूरचा कायापालट करण्यासाठी ड्रग्जमुक्ती आणि गुंडमुक्ती हा पहिला टप्पा असावा.
तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होताना या पवित्र नगरीला गुंडगिरी आणि ड्रग्जमुक्त करण्याचे वचनही द्या.