धाराशिव: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस सातत्याने आवाज उठवत आहेत. मात्र, त्यांच्या या लढ्याचा गैरफायदा घेत धाराशिवचा ‘ब्लॅकमेलर’ आशिष विसाळ अधिकाऱ्यांना गंडवत होता!
हा भामटा “मी आ. सुरेश धस यांचा खासगी पीए आहे” असं सांगत सरकारी अधिकाऱ्यांना “देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करा” असे सांगून खंडणी मागत होता. मात्र, मराठा कार्यकर्त्यांनी हा फसवणुकीचा प्रकार हेरून त्याला भरचौकात तुडवले! या मारहाणीतून जीव मुठीत घेऊन बचावलेला विसाळ सध्या पोलीस ठाण्यात आहे, पण त्याचा चोपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धस यांची भीती दाखवून दोन वर्षांचा ‘गोरखधंदा’!
विसाळ याने गेली दोन वर्षं आमदार सुरेश धस यांच्या नावाचा गैरवापर करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा मोठा धंदा उभा केला होता. तो धाराशिव जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध खोट्या तक्रारी करायचा. त्या तक्रारींवर चौकशी सुरू झाली की, कर्मचारी घाबरून ‘सेटलमेंट’च्या नावाखाली पैसे द्यायचे.
त्याच्या या धंद्याने इतकं टोक गाठलं की, नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनाही ब्लॅकमेल करून स्वतःचं ‘कल्याण’ करून घेतलं!
‘बांधकाम तक्रारीतून कमाई – १८ लाखांची गाडी, भरघोस बँक बॅलन्स’
बांधकाम परवानग्यांमध्ये त्रुटी दाखवून पूजा प्रसाद पाटील आणि बांगड बांधकाम प्रकरणी तक्रारी केल्या आणि त्यातून खंडणी वसूल करून तब्बल १८ लाखांची गाडी खरेदी केली. इतकंच नव्हे, तर खासगी बँकेत २ कोटींची ठेव टाकून तो मोठ्या रुबाबात फिरत होता.
‘आ. सुरेश धस यांच्या आशीर्वादाने?’ – मोठा प्रश्नचिन्ह!
आता या संपूर्ण प्रकारानंतर “विसाळच्या या कारवायांना आ. सुरेश धस यांचा आशीर्वाद होता का?” हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. धस यांना याबाबत माहिती होती का? त्यांनी यावर काय भूमिका घेतली?” याचा लवकरच खुलासा होणे गरजेचे आहे.
पोलिस तपासाचा वेग वाढला – आणखी ‘गुपितं’ बाहेर येणार?
विसाळचा ‘ब्लॅकमेलिंग’ व्यवसाय फक्त धाराशिवपुरता मर्यादित नव्हता का? आणखी कोणकोणत्या अधिकाऱ्यांना गंडवले? कोणकोणत्या राजकीय नेत्यांची नावं यात वापरली? याचा तपास आता वेगाने सुरू आहे.
➡ धाराशिवकरांमध्ये खळबळ – आणखी मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता!