धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालू ठेवावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात यंदा ४,६२,८७२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती, ज्यातून ७८,५९,५६६ क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील ३५,४०० शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर नाव नोंदणी केली असून, १० डिसेंबर २०२४ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत केवळ ९,३८० शेतकऱ्यांकडून २,४१,००० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. म्हणजेच जवळपास २५,००० शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्यापही बाकी आहे.
खरेदी केंद्रांवर सध्या दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांची कडता, चाळणी या नावाखाली लूट होत असल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला आहे. केंद्र सरकारने राजस्थानमधील सोयाबीन खरेदी केंद्रांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे, तर महाराष्ट्रातील केंद्रांना फक्त ३१ जानेवारीपर्यंतच मुदतवाढ का दिली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.